औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील पिवळ्या रंगाच्या भक्ती वाघिणीने शनिवारी दोन पांढऱ्या रंगाच्या बछड्यांना जन्म दिला. या दोन बछड्यांमुळे सिद्धार्थमधील पांढऱ्या वाघांची संख्या पाच झाली आहे. एवढे पांढरे वाघ असणारे सिद्धार्थ उद्यान राज्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय मानले जात आहे. आतापर्यंत ४२ वाघांना जन्म मिळालेले सिद्धार्थ उद्यान हे व्याघ्रजननाचे नवे केंद्र असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सिद्धार्थ उद्यानात समृद्धी वाघिणीने २५ डिसेंबर रोजी पाच वाघिणींना जन्म दिल्यानंतर सव्वा तीन महिन्यांनी पुन्हा एकदा नवे दोन पाहुणे जन्माला आले आहेत. शनिवारी पांढऱ्या रंगाचा वीर वाघ व पिवळ्या रंगाच्या भक्ती वाघिणींपासून दोन बछडे जन्माला आली आहेत. सिद्धार्थमधील एकूण वाघांची संख्या आता १६ झाली असून त्यात वीर, अर्पितासह पाच पांढरे तर ११ पिवळ्या रंगाचे वाघ-वाघीण आहेत. या सर्व वाघांचे पालकत्व एसबीआय बँकेने घेतलेले आहे.

औरंगाबाद हे व्याघ्रजननाचे नवे केंद्र असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मागील २५ ते ३० वर्षांत दोन जोड्यांपासून ४० पेक्षा अधिक वाघांचा येथे जन्म झालेला आहे. येथे जन्मलेले तब्बल १६ वाघ पुढे राज्यातील इतर प्राणिसंग्रहलायासह इंदूर, सतना आदी परराज्यातील विविध उद्यानातही देण्यात आलेले आहेत.

बाटलीतील दूध

भक्ती वाघिणीने दिलेल्या दोन बछड्यांची प्रकृती सध्या उत्तम असून त्यांना सध्या आईचे दूध मिळत नसल्याने बाटलीतून दूध पाजले जात आहे. सर्वाधिक पांढरे वाघ असणारे सिद्धार्थ हे राज्यातील एकमेव उद्यान आहे.

– संजय नंदन, पशुधन पर्यवेक्षक, सिद्धार्थ उद्यान.