20 September 2019

News Flash

राष्ट्रध्वज उलटा फडकला; मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा

पिशोर ठाण्यात दोन मुख्याध्यापकांवर गुन्हा

(संग्रहित छायाचित्र)

कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यांत १५ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुख्याध्यापकाविरुद्ध राष्ट्रध्वज उलटा फडकल्यामुळे राष्ट्रगीत मध्येच रोखल्याप्रकरणी, तर दुसऱ्यावर मुलींशी अश्लील वर्तन केल्यामुळे ग्रामस्थांनी मारहाण करून ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पिशोरचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी दिली.

कन्नड तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषद शाळेत १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाच्यावेळी मुख्याध्यापक बळे यांनी उलटा झेंडा फडकावला. राष्ट्रगीत सुरू होताच ही बाब लक्षात आल्यानंतर बळे यांनी सर्वाना अर्ध्यातच रोखले. राष्ट्रध्वज पुन्हा योग्य पध्दतीने फडकावून राष्ट्रगीत म्हटले. या प्रकारामुळे मुख्याध्यापक बळे यांनी उपस्थितांची माफी मागितली. मात्र शालेय समितीचे सदस्य सर्जेराव घुगे यांनी पिशोर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुख्याध्यापक बळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना चिंचोली लिंबाजी येथील आहे. येथील मुख्याध्यापक नागोराव कोंडिबा काकळे हे काही दिवसांपासून विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत असल्याचा आरोप होत होता. मुली भयभीत झाल्यामुळे काही मुलींनी शाळेत जाणे सोडले होते. त्यातील काही मुलींनी हा प्रकार सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळीच मुख्याध्यापक काकळे यांना एका खोलीत मारहाण केली. पोलीस पाटील नीलेश बलसाने आणि इतर नागरिकांनी काकळे यास सोडवले. यानंतर पिसोर ठाण्यात तक्रार देण्यात आली. मुख्याध्यापक काकळे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद करून अटक केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी सांगितले.

First Published on August 17, 2019 12:46 am

Web Title: flags flip upside down offense against the headmaster abn 97