‘सीआयएसएफ’सह पोलिसांचे प्रात्यक्षिक

औरंगाबाद : अतिरेक्यांनी एखाद्या विमानाचे अपहरण केले, तर नेमके त्याला तोंड कसे द्यायचे, याचे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) मंगळवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आले. सीआयएसएफच्या जवानांसह औरंगाबाद पोलिसांनी या मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला होता. विमान अपहरणाचे मॉकड्रिल सुरू असल्याचे समजल्यावर विमानातून आलेल्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

सिडको एन-१ भागात मंगळवारी सकाळी शिरलेल्या बिबटय़ाचा थरार सुरू असतानाच सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास मुंबईला जाणाऱ्या विमानाचे अपहरण झाले असून ते विमान चिकलठाणा विमातळावर अतिरेक्यांनी आणले असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांच्या काळात दंगा नियंत्रण पथक, क्यूआरटी पथक, विशेष कमांडो पथक घेऊन पोलीस उपायुक्त मीना मकवाना, विशेष शाखेचे निरीक्षक संतोष पाटील आदींचे पथक विमानतळावर दाखल झाले. विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, सीआयएसएफचे अधिकारी व पोलिसांनी अपहरण झालेल्या विमानातील अतिरेक्यांशी तसेच दिल्ली आणि मुंबईतील गृहमंत्रालयाशी फोनवर संपर्क साधला. जवळपास सव्वाअकरा वाजेपासून सुरू झालेला हा थरार दुपारी १ वाजेपर्यंत सुरू होता.

दरम्यानच्या काळात, विमानतळावर उतरलेल्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांना खाली उतरण्यास मज्जाव करण्यात आल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. नंतर सीआयएसएफच्या जवानांसह क्युआरटी पथकातील कमांडोंनी विमानाचा ताबा घेत, प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. विमानातून उतरलेल्या प्रवाशांना हे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.