राजस्थान, मध्यप्रदेशातूनही मागणी वाढली

बिपीन देशपांडे, औरंगाबाद</strong>

सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्य़ातील पूरस्थितीचा फटका तेथील साखर कारखानदारी व्यवस्थेला बसलेला असून मराठवाडय़ात सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्रही घटत चालले आहे. परिणामी स्थानिक साखर उद्योग अडचणीत सापडला असून घटत्या उत्पादनाचा परिणाम साखरेच्या दरात होत आहे. औरंगाबादेत क्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपये दर वाढलेले आहेत. यापुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता कारखाना प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यात गतवर्षी १०७ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. त्यातील एक तृतीयांश साखरेचे उत्पादन हे सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्य़ांमधील कारखान्यांतून होते. यंदा मात्र या तीन जिल्ह्य़ातील साखर कारखाने पूरस्थितीमुळे अडचणीत सापडले आहेत. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील उसाच्या क्षेत्राला पुराचा मोठा फटका बसला आहे. त्याचे परिणाम येत्या गळीत हंगामात दिसतील. त्यामुळे उत्पादनात घट होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. याच्या नेमकी उलटी परिस्थिती मराठवाडय़ातील आहे. मागील काही वर्षांमध्ये सतत दुष्काळी परिस्थिती आहे. अत्यल्प पावसामुळे मराठवाडय़ात दोन वर्षांपूर्वी ७२२.९४ हेक्टरवरच लागवड करण्यात आली होती. तर गतवर्षी खरिपातील उसाच्या पेरणीचे क्षेत्र जेमतेम २७.८६ टक्क्य़ांवरच होते. यंदाही खरीप हंगामात उसाचे क्षेत्र ३.५१ टक्केच आहे.

मराठवाडय़ातील उसाचे क्षेत्र घटत असल्यामुळे उत्पादनावरही परिणाम होत आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद व नांदेड असे दोन विभाग असून त्यामध्ये अनुक्रमे १३ व ११ सहकारी कारखाने आहेत. तर अनुक्रमे ११ व १२ खासगी कारखाने आहेत. औरंगाबाद विभागातील कारखान्यांमधून २०१८-१९ च्या गळीत हंगामात ८८.७३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले तर नांदेड विभागातून ७८.६२ लाख मेट्रिक टन गाळप झाले. यातून औरंगाबाद व नांदेड विभागात अनुक्रमे १६३.७२ व ९३ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झालेले आहे, अशी माहिती सहायक साखर आयुक्त कार्यालयाकडून मिळाली. दुष्काळी परिस्थितीमुळे उसाच्या लागवडीचे क्षेत्र घटले. परिणामी औरंगाबाद व नांदेड विभागातील अनुक्रमे २८ व २४ साखर कारखाने गतवर्षी बंदच होते. त्यामुळे साखरेचे अत्यल्प उत्पादन झाले. त्यात आता सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील साखर खरेदीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांतील व्यापाऱ्यांकडून मराठवाडा, अहमदनगर भागातील कारखान्यांकडून साखर खरेदी केली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक कमी झाली. परिणामी साखरेचे दर किलोमागे दोन रुपयांनी तर क्विंटलमागे २०० ते २५० रुपये वाढल्याचे व्यापारी नीलेश दायमा यांनी सांगितले.

मराठवाडय़ातील दुष्काळी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा फटका साखर उद्योगाला बसला आहे. उसाचे क्षेत्र आणि साखरेचे उत्पादन घटत चालले आहे. शिवाय साखर साठय़ाबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णयाचे परिणाम साखरेच्या दरावर होणार आहेत. कारखान्यातून एम-३० साखरेचा दर सध्या ३ हजार ३०० पर्यंत झाला आहे.

– गिरीश लोखंडे, युनिट हेड, जयमहेश साखर कारखाना