24 January 2020

News Flash

गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात पूर

नदीकाठच्या १५ गावांतून ५१३ जणांना सुरक्षितस्थळी हलविले

(संग्रहित छायाचित्र)

 

नाशिक जिल्ह्य़ात झालेल्या तुफान अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या धरणसमूहातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला होता. गंगापूर तालुक्यातील नऊ आणि वैजापूर तालुक्यातील सहा गावांमधून ५१३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. जायकवाडी धरणात मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून दुपापर्यंत जायकवाडीत २४.६३ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. आतापर्यंत १८.१८ टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह भविष्यात शेतीच्या आवर्तनाचा प्रश्नही सुटण्याची शक्यता आहे.

नाशिकमधून जसा विसर्ग वाढत गेला, तसतसे गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले. नेवरगाव, हैदतपूर, बागडी, जामगाव, ममदापूर, आगरकानेटगाव, लखमापूर, कायगाव या गावांमधील ३५ कुटुंबातील १६३ जणांना लाडगाव येथील प्राथमिक शाळेत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तसेच नागमठाण, चेंडूफळ, डोणगाव, बाभूळगाव (गंगा), आफतारा, वांजरगाव, शिंदेवस्ती, पुरणगाव येथील साडेतीनशेहून अधिक लोकांना जीवरक्षक आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातील जवानांनी सुरक्षित स्थळी आणले आहे. दरम्यान, सरला बेट येथील रामगिरी महाराजांना सुरक्षित बाहेर घेऊन येण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. पाण्याचा वेग एवढा अधिक होता की, त्यात बोट नेणे सुरक्षित नसल्याचे जवानांचे म्हणणे होते. मात्र, सरला बेटवरील महाराजांच्या पाठीराख्यांनी त्यांना सुरक्षितपणे स्वत:च्या बोटमधून बाहेर आणले. वेगाने होणाऱ्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमधील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये पाणी घुसल्याचे वृत्त आहे. मात्र, नुकसान किती हे समजू शकले नाही. रविवार सकाळपासून दुर्गम भागातील व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी जवानांनी काम सुरू केले होते. आज दुपापर्यंत ते सुरूच होते. सकाळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी वांजरगाव येथील पूरस्थितीची पाहणी केली. या दोन्ही तालुक्यांमध्ये पुराचा काहीअंशी तडाखा बसला असला तरी परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने घेतला. याच वेगाने जायकवाडी धरणात पाणी आले तर येत्या दोन दिवसांत धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा ४५ टक्के जाऊ शकतो, असा प्रशासनाचा दावा आहे.

जायकवाडी धरणात पाण्याची आवक होत असली तरी मराठवाडय़ातील निम्मदुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीनाकोळेगाव या धरणांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा नाही. काही धरणे शून्याच्याही खाली आहेत.

First Published on August 6, 2019 1:59 am

Web Title: floods in gangapur and vaijapur talukas abn 97
Next Stories
1 शिवसेनेत गुणवत्तेवर भरती
2 नोकरीसाठी १४ वर्ष प्रतीक्षा; पोलीस कन्येला ‘मॅट’चा दिलासा
3 औरंगाबाद : ओढ्यात वाहून गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
Just Now!
X