22 February 2020

News Flash

चारा छावण्यांची २० पथकांमार्फत चौकशी

बीड जिल्ह्य़ात घोळ, जनावरांची संख्या १३ हजारांनी घटली

प्रतिकात्मक छायाचित्र

बीड जिल्ह्य़ात घोळ, जनावरांची संख्या १३ हजारांनी घटली

औरंगाबाद/ बीड : कोल्हारवाडी येथील मत्स्यगंधा सेवाभावी संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या चारा छावणीच्या तपासणीनंतर छावणीतील गैरप्रकार मोठय़ा प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. मंगळवारी जनावरांची संख्या १३ हजार ९४९ने घटली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, गैरव्यवहाराचे प्रकार उघडकीस आल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीड जिल्ह्य़ातील छावण्यांची तपासणी करण्यासाठी २० पथकांची नियुक्ती केली. त्यांनी केलेल्या तपासणी अहवालातही बरेच गैरप्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, अद्याप या पथकांच्या नोंदीचे अहवाल पूर्ण झालेले नाहीत.

१३ मे रोजी बीड जिल्ह्य़ातील चारा छावणीमध्ये तीन लाख ९९ हजार ९५६ जनावरे होती. काही दिवसांपूर्वी म्हणजे ८ मे रोजी ही संख्या चार लाख २१ हजार ४१८ एवढी होती. बीड जिल्ह्य़ात चारा छावण्यांमध्ये कार्यकर्त्यांनी बरेच घोळ घातले असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्रेकर यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. कोल्हारवाडी येथील चारा छावणीला उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी  भेट दिली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास भेट दिल्यानंतर जनावरांची संख्या मोजू न देता छावणी चालकांनी वीज घालवली. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात पुढील कारवाई करावी लागली. या घटनेनंतर बीड जिल्ह्य़ातील सर्व छावण्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार आष्टी आणि पाटोदा या दोन तालुक्यांत जनावरांच्या संख्येत फारसा फरक आढळून आला नाही. मात्र, अन्य तालुक्यांमध्ये मोठे घोळ असण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर हा मुद्दा राजकीय पातळीवर चर्चेत असून प्रकरण राजकीय होईल म्हणून बीड जिल्ह्य़ातील अधिकारी त्यावर फारसे बोलण्यास तयार नाही. कोल्हारवाडी येथील संस्था शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते. अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेला मुद्दा चुकीचा असल्याचे नंतर सांगण्यात आले.

महिनाभर  जनावरांची संख्या खोटी दाखवून शासनाची लूट होत होती का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या दोघा जणांना बीड जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले असले तरी वरिष्ठ अधिकारीही जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. तहसीलदारांवरही कारवाई होईल, असे सांगण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत गैरव्यवहाराला थारा दिला जाणार नाही, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले.

First Published on May 17, 2019 1:54 am

Web Title: fodder camps investigation through 20 squad
Next Stories
1 खिचडी खाण्यालाही मुलांकडून ‘सुटी’
2 पवारांनंतर काँग्रेस, भाजप नेतेही दुष्काळ पाहणीसाठी दौऱ्यावर
3 बालविवाह रोखण्यासाठी मंगल कार्यालयांची मदत