कोटा संपल्याने शेतकऱ्यांची अडचण

औरंगाबाद :  केंद्र सरकारकडून मका खरेदीसाठी देण्यात आलेला कोटा संपल्याने वाढीव १५ हजार टन मका खरेदीसाठी पाठपुरावा केला जात असल्याची माहिती पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. मका खरेदीसाठी अनेक शेतकऱ्यांना टोकन दिलेले आहे. मात्र, कोटा संपल्याने अडचण निर्माण होत होती. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधून राज्यातील तीन-चार जिल्ह्यांतील ही समस्या कानावर घातली. त्यांनीही केंद्र सरकारकडे मका खरेदीसाठी वाढीव कोटा देण्याची मागणी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या जिल्ह्यात मका पीक अधिक होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदी केल्या. मात्र, केंद्र सरकारने ठरवून दिलेला कोटा कमी असल्याने हे केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली. ही अडचण सोडविण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यांनीही केंद्र सरकारकडे या अनुषंगाने मागणी नोंदविण्यात आल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात अद्यापि सात हजार ७७५ जणांकडील मका खरेदी होणे बाकी आहे. खरेदीसाठी माल घेऊन असे संदेश चार हजार ९२० जणांना देण्यात आले होते. ८४ हजार क्विंटल मका खरेदी झाली असून साडेपाच हजार क्विंटल मका खरेदी होणे  बाकी असल्याचा अंदाज खरेदी विक्री संघाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  तसे पत्र राज्य सरकारला पाठविण्यात आलेले आहे. गंगापूर, वैजापूर, फुलंब्री येथे मका खरेदी व्हावी म्हणून वाहने थांबलेली आहेत. साधारणत: ३०० वाहनाच्या रांगा असल्याने सरकारही या बाबत गांभीर्याने पाठपुरवा करत आहे. अद्याप केंद्र सरकारकडून नवा कोटा मंजूर झालेला नाही. राज्यातील तीन जिल्ह्यांतील हा प्रश्न असून त्यासाठी पाठपुरवा केला जात असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.