घरगुती कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी शिळे अन्न खाऊन विषबाधा झाल्याने ५१ जणांना किनवटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना तेलंगाणातील आदिलाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातल्या किनवटपासून ७ कि.मी. अंतरावर मांडवा (निमगुडा) या गावात राहणाऱ्या राम कुमरे यांच्या घरी घरगुती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नातवाच्या पाचवीच्या कार्यक्रमानिमित्त राम कुमरे यांनी नातेवाईक, आप्तेष्टांना भोजनासाठी बोलावले होते. २३ ऑक्टोबर रोजी तयार केलेले जेवण नातेवाईकांनी खाल्ले. शिळे अन्न खाल्ल्यानंतर रात्री अचानक सगळ्यांनाच पोटदुखी, उलटी व शौचाचा त्रास सुरू झाला. गावातील काही नागरिकांच्या मदतीने विषबाधा झालेल्यांना किनवटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यापकी ओमेश्वर शामराव घोडाम (वय ६), वनश्री सिडाम (वय ४), वनिता घोडाम (वय ४२) व समीक्षा कोते (वय ६) यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना आदिलाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचे वृत्त समजल्यानंतर आमदार प्रदीप नाईक, तहसीलदार शिवाजी राठोड, माजी आमदार भीमराव केराम, जिल्हा परिषदेचे प्रकाश राठोड, आदींनी रुग्णालयात धाव घेतली.