येथील पाच कोटीच्या धान्य घोटाळय़ात पोलिसांना आजवर छोटे मासे सापडले, मात्र या गुन्ह्यात पोलिसांनी माजी नगराध्यक्ष सय्यद महेबूब अली पाशा यांना अटक केली आहे. येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांतील चार कोटी ९७ लाख रुपयांचे १९ हजार १४१ िक्वटल धान्य गायब झाल्या प्रकरणाचा तपास आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे हे करीत आहेत.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी १ ते ९ ऑगस्ट दरम्यान केलेल्या तीन गोदाम तपासणीत १९ हजार १४१ िक्वटल धान्य गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या धान्य घोटाळय़ासंबंधीचा गुन्हा जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे यांच्या तक्रारीवरून गोदामपाल अनिल अंबेराव, मुकादम शेख महेबूब या दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सुरुवातीपासून या धान्य घोटाळय़ाचा तपास कोतवालीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे करीत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावरून धान्य घोटाळा प्रकरणात तहसीलदार संतोष रुईकर यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई झालेली आहे. आरोपी आंबेराव व महेबूब यांनी पोलीस कोठडी असताना दिलेल्या माहितीवरून स्वस्त धान्य दुकानदार पवन बनसोडे व वसंत देशमुख यांना अटक करण्यात आली. नंतर काही दिवसांत दुसरे दोन स्वस्त धान्य दुकानदार पांडुरंग सावंत व प्रदीप दमकोंडे यांनाही अटक झाली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच गोदामपाल अनिल आंबेराव यांचा न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळून लावला.

या धान्य घोटाळय़ाच्या गुन्ह्यात काही सामाजिक कार्यकत्रे व राजकारणी पुढाऱ्यांचाही संबंध असू शकतो, अशी शंका उपस्थित होत होती. आजपर्यंत पोलिसांच्या गळाला बडा मासा लागला नव्हता.

परंतु काल काद्राबाद प्लॉटस्थित माजी नगराध्यक्ष सय्यद महेबूब अली पाशा यास या गुन्ह्यात पकडण्यात आले. पाशा यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान व रॉकेल एजन्सी आहे. ते काही काळ परभणी नगरपरिषदेचे अध्यक्ष होते.

दुसऱ्या आरोपीलाही पाच दिवसाची कोठडी

धान्य घोटाळ्यातच पोखर्णी येथील स्वस्त धान्य दुकानदार सिद्धेश्वर शेषराव पांचाळ यास काल रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. आज बुधवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता १२ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याच गुन्ह्यातील माजी नगराध्यक्ष सय्यद महेबुब अली पाशा यासही सोमवापर्यंत (दि. १२) पोलीस कोठडी देण्यात आली आहे.