मराठवाडय़ात एका बाजूला तीव्र दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांचे आकडे वाढत जाणारे, तर दुसरीकडे मद्यपानाच्या सवयीही बदलत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. मराठवाडय़ाच्या आठही जिल्हय़ांत एप्रिल ते ऑगस्टदरम्यान देशी मद्य आणि बीअर विक्रीत कमालीची घट, तर विदेशी मद्यपानाचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. आकडेवारीचे विश्लेषण करताना रोजगाराच्या शोधात झालेल्या मजुरांच्या स्थलांतराचा पलू हेही एक कारण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ आवर्जून सांगतात.

विशेष म्हणजे या जिल्ह्य़ात विदेशी मद्यविक्रीतही घट झाली. ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी या जिल्हय़ाची ओळख आहे. काही तालुक्यांत तीव्र दुष्काळ असल्याने अनेक मजूर कुटुंबांचे स्थलांतर झाले असावे, असे सांगितले जात होते. त्यास बळकटी देणारी ही आकडेवारी आहे.
हे चित्र प्रत्येक जिल्हय़ात वेगवेगळे असले, तरी त्यास ग्रामपंचायत निवडणुकांचीही किनार आहे. ऐन दुष्काळात होत असलेल्या निवडणुकांमुळे प्रत्येक गावात विदेशी मद्याचा वापर अधिक झाला असावा. परिणामी विदेशी मद्यातील विक्रीत वाढ झाली आहे. विशेषत: उस्मानाबाद जिल्हय़ात ही वाढ सर्वाधिक म्हणजे १२ टक्के आहे. विशेष म्हणजे बीअर विक्रीतही वाढ झाली नाही.

मराठवाडय़ाच्या आठही जिल्हय़ांतील देशी दारूविक्रीत ८.३ टक्के घट झाली आहे. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान सर्वात कमी विक्री झालेले जिल्हे बीड व लातूर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन जिल्हय़ांतील विक्रीच्या आकडेवारीत मोठी घट आहे. गेल्या वर्षी बीडमध्ये २४ लाख ८९ हजार ३०८ लिटर दारूविक्री झाली. ती या वर्षी २१ लाख २७ हजार लिटर झाली. ही घट १५ टक्के आहे.