राष्ट्रवादीअंतर्गत पंडित वादाचे पर्यवसान
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या गेवराई तालुका पंचायत समिती कार्यालयातून वारंवार पाठपुरावा करूनही कामे होत नसल्याच्या कारणावरून गुरुवारी राष्ट्रवादीचेच माजी मंत्री बदामराव पंडित व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी बी. डी.चव्हाण यांना मारहाण केली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राष्ट्रवादीतीलच दोन नेत्यांमधील संघर्षांत अधिकाऱ्यावर मार खाण्याची वेळ ओढवली.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित व माजी आमदार बदामराव पंडित यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. काही दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यात दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यास आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरही पक्षाच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीतूनच शेतकऱ्यांची कामे होत नाहीत, कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, मी माझ्यावरील अन्याय सहन करीन; पण कार्यकर्त्यांवरील करणार नाही, असा इशारा बदामराव पंडित यांनी दिला होता.
तालुका पंचायत समितीवर आमदार अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व आहे. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी काही शेतकऱ्यांच्या विहिरींच्या मंजुरीबाबत पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने बदामराव पंडित हे कार्यकर्त्यांसह दुपारी पंचायत समितीत दाखल झाले. गटविकास अधिकारी चव्हाण यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने कार्यालयातच पंडित व त्यांच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना मारहाण केली. मारहाण होताच अधिकारी कार्यालयातून निघून गेले. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी चव्हाण यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात बदामराव पंडित यांच्यासह ३० ते ४० लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलूबुम्रे यांनी पंचायत समितीला भेट दिली.