|| सुहास सरदेशमुख

शाळाच न पाहिलेल्या पहिलीतील मुलांची अक्षर-अंकओळख अवघड

औरंगाबाद :पहिलीतून दुसरीमध्ये जाताना गेले वर्षभर विद्यार्थ्यांनी शाळा, वर्ग, शिक्षकांचा चेहराच प्रत्यक्ष पाहिला नाही, अशा विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतांचा बोजा येत्या वर्षभरात कसा भरून काढायचा, असा पेच शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. भविष्यात करोनाचे संकट असेच कायम राहिले तर प्राथमिक शिक्षणाचा पाया कच्चाच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

याबाबत अजिंठा लेणीच्या भोवताली दत्तवाडी गावात अध्ययन अध्यापनात ठसा उमटविणारे शिक्षक बापू बावीस्कर म्हणाले, ‘सोयगाव तालुक्यात दस्तापूर, काडदरी, सावरखेडा तसेच भोवतालच्या गावात शाळेत वीज, पाणी आणि जाण्यासाठी नीट रस्ताही नाही. अशा भागात मोबाइल तरी कसे वापरणार. एखाद्या गावात क्षीण लहरी पोहोचत असल्या तरी त्यावर ऑनलाइन शिकविणे तसे शक्य नाही. पहिलीतील मुलास केवळ ऑनलाइन शिकवता येत नाही. सहविद्यार्थ्यांकडे बघत आणि शिक्षकांच्या मदतीशिवाय अंक ओळख आणि अक्षर ओळख करणे खूप अवघड असते. पालकांचा सहभाग अधिक असेल तरच यात बदल घडतात. ‘नेबर कट्टा’ असा उपक्रम राबवून आम्ही प्रयत्न केले. या सर्व शाळा कमी पटसंख्येच्या आहेत. त्यामुळे बहुतांश शाळा द्विशिक्षकी. त्यात एखादा प्रतिनियुक्तीवर गेला किंवा अन्य कामात अडकला की शिकवणे महाकठीण काम. त्यामुळे आता बहुवर्ग अध्यापनाचे पर्याय शिक्षक हाती घेऊ सांगत असले तरी एका वर्षात दोन वर्षांचे अध्ययन-अध्यापन कसे करावे असा प्रश्न सर्वत्र आहे.

या परिसरात दस्तापूर येथे शिकविणारे शिक्षक जितेंद्र बागुल म्हणाले, ‘‘जरी पहिलीमध्ये आम्ही काही प्रयत्न करून शिकवले तरी करोनाकाळ आणि संपर्क यातील अंतर एवढे अधिक होते, की पहिलीतील विद्यार्थ्यांच्या डोक्यातून ही बाब अधिक लवकर पुसली जाण्याची शक्यताच अधिक आहे.’’ या परिसरातील लेणापूर नावाच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नीट नाही. जेथे मोबाइल सुरू आहे तेथे, दहा मुलांना ऑनलाइन शिकवावे असे प्रशासकीय पातळीवरून सांगणे आणि ते काम पूर्ण झाले आहे अशा नोंदी कागदोपत्री घेणे यात मोठे अंतर असल्याचे शिक्षक सांगतात. या अनुषंगाने शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘‘ही समस्या आहेच. यावर अध्ययन-अध्यापन क्षेत्रातील नियोजन करणाऱ्यांनी काम करायला हवे. वाढत्या वयाबरोबर समजही वाढत जाते. पण दोन वर्षांच्या अध्यापनाचा शिक्षकांवर बोजा असू शकतो. संकट काळातील नवोपक्रम शोधून काही काम झाले तर चांगले आहे.’’

नेमका पेच?

गेल्या वर्षभरात पहिलीमध्ये किती विद्यार्थी प्रवेशित झाले होते याचे आकडे मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत संकलित झाले नव्हते. सांख्यिकीय माहिती संकलन तक्ता भरण्याचे (युडायस) काम करोनाकाळात पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे दुसरीत गेलेल्या मुलांना अक्षर आणि अंकओळख होणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तांत्रिक तुटलेपण…

मेळघाट, धुळे, मराठवाड्यातील डोंगराळ भागात तसेच विदर्भातील घनदाट जंगलाभोवताली असणाऱ्या गावामध्ये भ्रमणध्वनी संचार यंत्रणा पुरेशी नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी मिळविण्यासाठी जेथे ‘रनर’ ठेवावे लागतात, अशा भागात उत्तीर्ण झालेल्या पहिली आणि दुसरीतील मुलांना शिकविण्याची मोठी अडचण आहे, असे सांगण्यात येते.