मराठवाडय़ातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व हिंगोली हे चार जिल्हे आता काँग्रेसमुक्त म्हणून ओळखले जातील. सिल्लोडमध्ये शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रभाकर पालोदकर यांना उतरवण्यात आले. मात्र पालोदकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी नाकारली. ऐनवेळी सिल्लोडमध्ये सत्तार यांच्याविरोधात काँग्रेसने कैसर आझाद यांना उतरवले. आझाद हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले, तर फुलंब्रीतून काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे होते. डॉ. काळे हे भाजप उमेदवार हरिभाऊ बागडे यांना  लढत देणारे एकमेव उमेदवार ठरले.

बीड जिल्ह्य़ातही काँग्रेस नावालाही उरली नाही. विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार काँग्रेसकडून उभा नव्हता.  उस्मानाबादही एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. बसवराज पाटील, मधुकर चव्हाण, सिद्रामअप्पा आलुरे गुरुजी, यांनी उस्मानाबादमध्ये काँग्रेस जिवंत ठेवली होती. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ८५ वर्षांचे मधुकर चव्हाण यांचा राष्ट्रावादीतून भाजपमध्ये गेलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी पराभव केला.