भाषाशास्त्री गणेश देवी यांची खंत

औरंगाबाद : भाषेतील एक शब्द तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. आपली मातृभाषा ही इतरांचा तिरस्कार करण्यासाठी नाही, असे सांगत जगभरातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा या येत्या ३० वषार्ंत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर १ हजार ७०० भाषा या शरपंजरीवर असतील, अशी चिंतायुक्त भीती पद्मश्री, भाषाशास्त्री गणेश देवी यांनी व्यक्त केली. भाषा नष्ट करण्याचे काम जनगणना अधिकाऱ्यांकडून अत्यंत क्रूरपणे केले गेले, असे परखड मत व्यक्त करताना ते म्हणाले की, भाषा नष्ट करणारी एक मानवी लाटच तयार झाली आहे.

येथील विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय विवेकानंद व्याख्यानमालेत ते शुक्रवारी बोलत होते. गणेश देवी यांनी भारतीय मातृभाषांचे भवितव्य, या विषयावरील दुसरे पुष्प गुंफले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ, संस्थेचे कोषाध्यक्ष तुषार पाटील, डॉ. यशोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेश देवी म्हणाले, माणसाच्या मेंदूने दृश्य आकाराची भाषा स्वीकारायला सुरुवात केली आहे. मुलांच्या मेंदूत तशा घडामोडी होत आहेत. मोबाइल ही कृत्रिम स्मृती असून माणूस स्मृती जतन ठेवण्यासाठी बा मार्गाचा वापर केला जात आहे. माणूस उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून भाषेचा स्मृतिसंचय, स्मृतिशक्ती नष्ट करत आहे.

भाषा ही चित्त आणि माणसांना जोडणारा सेतू आहे. चित्ताची आई ही भाषा आहे. म्हणून आपण बोलतो ती मातृभाषा. सध्या जगामध्ये सहा हजार भाषांपैकी ३०० भाषा या २१व्या शतकाच्या अंतापर्यंत कशा-बशा जगतील. भाषासंचयाची ही स्मृतिशक्ती नष्ट होणाच्या मार्गावर आहे. ही करोडो वर्षांची संपत्ती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची खात्रीही जगभरातील भाषाशास्त्रींना झालेली आहे. भाषा अडचणीत आल्यामुळे प्रचंड विनाशाच्या युगात आपण येऊन पोहोचलो आहेत, असेही गणेश देवी म्हणाले. २०११ मधील जनगणनेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या नोंदीत ३ हजार ६०० पेक्षा जास्त मातृभाषांची नावे पुढे आली. मात्र, त्यातील १ हजार ९०० नावे अधिकाऱ्यांनी पुसून टाकली. पुन्हा ६०० भाषांची नावे अदखल यादीत समाविष्ट केली. भाषेशिवाय माणूस हा एका प्राण्यासमान भासणार असून भाषांना वाचवण्याचे मोठे अवघड आव्हान आपल्यापुढे उभे असल्याचेही गणेश देवी म्हणाले.