१९ जणांविरुद्ध गुन्हा; दोघे कोठडीत

वेगवेगळ्या विम्यातून ३७ लाखांचे अग्रिम (बोनस) देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्ताला १६ लाख ५४ हजार रुपयांना फसवल्याचे प्रकरण समोर आले असून या प्रकरणी १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील रवींद्र शंकर काजारी व सायली नागनाथ माने ऊर्फ सायली रवींद्र काजारी (रा. ठाणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील रवींद्र काजारी याला ३१ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे तर सायलीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले. गुन्ह्यत यापूर्वी पोलिसांनी झुल्फिकार फय्याज शेख याला अटक केली होती.

प्रकरणात म्हाडा कॉलनीतील ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक मोहन कडुबा सोनवणे यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, सोनवणे यांनी ८ ऑक्टोबर २०१५ रोजी बजाज लाइफ इन्शुरन्सची पॉलिसी काढली होती. पॉलिसीचे पसे तीन वर्ष भरल्यानंतर त्यांनी पसे भरणे बंद केले. ११ नोव्हेंबर २०१५ रोजी सोनवणे यांना पूजा देसाई हिने फोनवर तुमची पॉलिसीची रक्कम व कमिशन परत मिळेल, त्यासाठी तुम्हाला नवीन पॉलिसी काढावी लागेल, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून सोनवणे यांनी २५, ५१ व ९९ हजार रुपयांच्या तीन पॉलिसी काढल्या. त्यानंतर सोनवणे यांना फोन करून आधी ज्या दोन पॉलिसी दिल्या, त्या ऑटो कॅन्सल होतील व त्याची रक्कम तुम्हाला परत मिळेल असे सांगण्यात आले. ७ ऑक्टोबर २०१५ रोजी सोनवणे यांना ऋची पालकर हिने फोन करून थर्ड पार्टी पॉलिसी घेण्याचे सांगितले व सोनवणे यांचे जावई रितेश रायलकर (रा. पुणे) यांच्या नावाची पॉलिसी काढली. सोनवणे यांनी वरील कंपन्यांच्या सुमारे २ लाख ९१ हजार ३९४ रुपये किमतीच्या पाच पॉलिसी काढल्या. १४ डिसेंबर २०१५ रोजी ऋची पालकरचा फोन पुन्हा आला. तिने धनाकर्ष (डी.डी) क्रमांक देऊन तुम्हाला बोनसच्या रूपात धनाकर्ष पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र तो डी.डी. सोनवणे यांना आजगातागायत मिळाला नाही. प्रकरणात जवाहर नगर पोलीस ठाण्यात १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

तेथे सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी आरोपींच्या साथीदारांना अटक करणे असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.