07 December 2019

News Flash

जमील बेग मशिदीमध्ये दररोज सर्वधर्मीयांना केले जाते मोफत अन्नदान

आठ रुग्णालयांसाठी आणि उच्चशिक्षण घेत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांकरता जमील बेग मशिदीमध्ये गेल्या सहा वर्षांपासून सर्वधर्मीयांना मोफत अन्नदान केले जाते.

औरंगाबाद  शहरातील आठ रुग्णालयातील नातेवाईकांसाठी आणि उच्चशिक्षण घेत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांकरता जमील बेग मशिदीमध्ये गेल्या सहा वर्षांपासून मोफत अन्नदान केले जाते. सर्वधर्मीयांना मोफत जेवण वाढले जाते. विशेष म्हणजे जेवणासाठी आलेल्या इतर धर्मीयांना आपण मशिदीमध्ये जेवत आहोत याची जाणीवही होऊ दिली जात नाही. तरुणांकडून हा उपक्रम राबवला जातो. या संस्थेचे अध्यक्ष हमद-अल-उमरी(२८) दुबईमध्ये फार्मा कंपनीत अधिकारी आहेत तर सचिव अब्दुल मोईद अशर (३४) यांचा बर्फ तयार करण्याचा औरंगाबादेत कारखाना आहे. या कमिटीमध्ये शहरातील ११ सदस्य विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

ऑल इंडीया मजलिस-ए-तामिरे मिल्लत ही संस्था हा उपक्रम राबवत आहे. दोन निष्णात आचारी आणि २२ महिला दीड ते दोन हजार लोकांसाठी आनंदाने जेवण तयार करतात. शहरातील घाटी रुग्णालयासहित कॅन्सर हास्पिटल, एमजीएम रुग्णालय, सत्यविष्णू एम्स, जिल्हा आरोग्य रुग्णालय, जिल्ला आणि मुस्कान रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्णांचे नातेवाईकांसाठी ही संस्था काम करते.

त्याच प्रमाणे शहरात उच्चशिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी ज्यांना जेवणासाठी मेस लावणेही परवडत नाही त्या विद्यार्थ्यांची काळजी जमील बेग मशिदीमध्ये घेतली जाते तसेच शहरात कोणाकडे निधन झाल्यानंतर चूल पेटत नसेल अशा ठिकाणी मिल्लततर्फे जेवण पोहोचवले जाते.

घाटी रुग्णालयाला लागूनच ही ४०० वर्ष जुनी मशीद आहे. मलिक अंबरने पाणचक्की बांधण्याचे काम सुरु केल्यानंतर औरंगजेबचे दक्षिणेतील सरदार जमील बेग यांनी ही मशीद बांधली होती. घरगुती अन्न शिजवताना मंगळवार, बुधवार, शुक्रवार या उपवास नसलेल्या दिवशी मांसाहारी जेवण दिले जाते. या उपक्रमासाठी कोणतीही शासकिय मदत घेतली जात नाही कोणत्या राजकीय पुढार्‍यांचे मार्गदर्शन घेतले जात नाही.

जेवणासाठी प्रवेश करताना पुरुषांचे आणि महिलांचे प्रवेशद्वार वेगळे आहेत. रुग्णांना घेऊन आलेल्या नातेवाईकांना, रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या मित्रांची जेवणाची व्यवस्था कोणत्याही रुग्णालयाकडून होत नाही. म्हणून हा उपक्रम आम्ही आनंदानी राबवतो व हे काम करत असताना जे मानसिक समाधान मिळतं त्याची बरोबरी कोणताही आनंद देऊ शकत नाही असे बेग मशिदीचे व्यवस्थापक मोहम्मद अफरोज म्हणाले. शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे जवळपास अडीचशे लोक जेवणासाठी रोज सेवा बजावतात. या संस्थेत अध्यक्ष अमरी यांच्यासोबत शेख नदीम, मोहम्मद मन्सूर, शेख मोईन, मोईन खान, सय्यद समीर, असलम खान हे सहभागी आहेत.

First Published on February 11, 2019 12:34 pm

Web Title: free food distributed in aurngabad mosque
Just Now!
X