सततचा दुष्काळ आणि अवकाळीने क्षेत्रच संपुष्टात येण्याच्या मार्गावर

औरंगाबाद : मराठवाडय़ात ओला आणि सुका दुष्काळ केवळ कोरडवाहू शेतकऱ्यांनाच नुकसानकारक ठरत आहे असे नसून, फळबाग उत्पादकांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. आठवडाभरापासून बरसत असलेल्या परतीच्या पावसामुळे फळबाग उत्पादकही कोलमडून पडले आहेत. मराठवाडय़ातील जवळपास २५ हजार हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद लातूर विभागात २०१२-१३ च्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार एक लाख १५ हजार ९१९.६१ हेक्टरवर विविध प्रकारच्या फळबागा होत्या. त्यात प्रामुख्याने केसर आंबा, मोसंबी, डाळिंब, पेरू, अंजीर, केळी, द्राक्ष, लिंबू आदी प्रमुख फळांचा समावेश आहे. २०१२-१३ मधील भीषण दुष्काळानंतर अनेक फळबागा मोडीत निघाल्या. जालना आदी ठिकाणी मोसंबीच्या फळबागा शेतकऱ्यांनी अजूनही टिकवून ठेवल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यतील मोसंबी क्षेत्राच्या आकडेवारीनुसार २२ हजार ५८० हेक्टरवर लागवड  झालेली होती. मात्र नंतर हे क्षेत्र कमी होत गेले. जालना जिल्ह्यच्या आकडेवारीनुसार २१ हजार ३९० हेक्टरवर मोसंबीची लागवड झालेली होती. आता जालन्यातील वडीवाडी, रोशनगाव, हिवरा, हातवण, ममदाबाद, आंतरवाली, राणीउंचेगाव, माली िपपळगाव, कारला, सावरगाव आदी भागात दुधना, कुंडलिका नदीमुळे मोसंबीचे बऱ्यापकी क्षेत्र आहे. मात्र, आता परतीच्या पावसामुळे अनेक वर्षांपासून जगवलेल्या मोसंबीच्या बागांना फटका बसला आहे.

फळ उत्पादक दत्तात्रय गोरे म्हणाले, आपल्याकडे मोसंबीची आठशे झाडे आहेत. झाडांच्या बुडातील आळ्यात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला.

डासांनी रात्री फळावर हल्ला चढवला. एक-दोन दिवसातच फळगळती सुरू झाली. त्याचा फटका उत्पादकांना बसला. काढणीला आलेले फळ पावसाळी वातावरणामुळे व शेतातील चिखलामुळे काढता आले नाही. आता ते गळून पडू लागल्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

अशीच स्थिती आडगावचे लोखंडे यांचीही. त्यांच्याकडेही मोसंबीची झाडे आहेत. पण पावसामुळे फळ काढता आले नाही. आता फळ गळती सुरू झालेली आहे. प्रशासनाने फळबागांचेही पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.