१०० रुपयांचे पेट्रोल; पदरी फक्त ऐंशी रुपये?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 औरंगाबाद : चाळिशी पार केलेले महमूद बख्श रिक्षा चालवतात. गुरुवारी ८६.३१ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल घेतले. त्यात १४ रुपयांचे ऑइल टाकले. १०० रुपये पेट्रोल पंपवाल्याला दिले. दिवसभर रिक्षा चालवली. मिळालेल्या पैशांतून रिक्षा मालकाला १२० रुपये दिले. घरी गेलो तेव्हा बायकोच्या हातात ८० रुपये ठेवले. ते प्रश्न विचारत होते, सकाळी आठ वाजता बाहेर पडलो होतो. रात्री नऊ वाजता घरी गेलो. एवढे राबल्यानंतर मिळालेल्या ८० रुपयांत काय होते? रमजान सुरू आहे. इफ्तारीचे सामानसुद्धा घेता येणे अवघड झाले आहे. महमूद बख्श काही एकटे नाहीत. शहरातील पेट्रोलवरच्या रिक्षाचालकांचे असेच हाल आहेत.

पैठणगेटजवळील रिक्षा स्टँडजवळ महमूद बख्श, अजमतखान उभे होते. दोन-अडीच तास वाट पाहिल्यानंतर येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडल्यानंतर दिवसभरात त्यांनी ३०० रुपये कमावले. त्यातला एकही रुपया वायफळ खर्च केला नाही. रमजान महिना असल्यामुळे बिडीकाडी, पान यावरही पैसे खर्च झाले नाहीत. तरीही घरी जाताना निव्वळ राहिलेला नफा एवढा कमी होता की, जगणेच मुश्किल होऊन गेले आहे. ज्यांची रिक्षा पेट्रोलऐवजी सीएनजीवर चालते, त्यांचे जरा बरे आहे. पण पूर्णत: पेट्रोल वापरणाऱ्या रिक्षाचालकांचे अर्थकारण आक्रसले आहे. औरंगाबाद शहरात १४ हजार रिक्षा पेट्रोलवरच्या, तर सात हजार रिक्षा सीएनजीवर आहेत. काही दिवसांपूर्वी परवाने खुले करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि रिक्षांची संख्या वाढली. किमान तीन हजार रिक्षा वाढल्या असाव्यात, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय सूत्रांनी सांगितले. पेट्रोलचे दर वाढत जातात, ग्राहक मात्र अधिक पैसे द्यायला तयार नसतात. ज्या अंतरासाठी आदल्या दिवशी ३० रुपये दिले होते, त्या अंतरासाठी दुसऱ्या दिवशी अधिक पैसे कसे मागता येतील? पण गेल्या १२ दिवसांत पेट्रोलचे दर वाढत आहेत. आम्हाला मात्र ग्राहकांना दररोज दर वाढवून मागता येत नाहीत. औरंगाबादमध्ये ८६.३१ रुपये दराने मिळणाऱ्या पेट्रोलच्या दरात पुन्हा ३० पैशांची वाढ झाली आहे.

हप्ते फेडणे अवघड

पूर्वी मी किमान दीडदोनशे रुपये तरी घरी घेऊन जायचो. आता परवानाधारक रिक्षांची संख्या वाढली आहे. आधीच आमचा धंदा मंदीत आहे. त्यात पेट्रोल वाढले आहे. औरंगाबादचे रस्ते तर राज्याला माहीत आहेत. रिक्षाचा हप्ता फेडणे आता अवघड होऊन बसले आहे. मी भाडय़ाने रिक्षा चालवतो. पण माझ्या बहुतांश मित्रांचे बँकेचे हप्ते थकले आहेत.

-अजमतखान (रिक्षाचालक)

जगण्यावर  परिणाम

पेट्रोलच्या एकूण प्रतिलिटर दरापैकी साधारणत: नऊ रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत जातात. सरकारने गतवर्षी दुष्काळ, कर्जमाफी व दारुबंदीवर उपकर लावलेला आहे. याशिवाय मूल्यवर्धित कर आणि विक्रीकरही लावला जातो. करांच्या या रचना रिक्षावाल्यांना माहीत नाही, पण त्यांच्या दररोजच्या जगण्यावर मोठे परिणाम जाणवू लागले आहेत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel price hike hits economy of rickshaw drivers
First published on: 26-05-2018 at 03:23 IST