27 September 2020

News Flash

पाच करोनारुग्णांच्या किराडपुरा भागात फुरकान नावाची ‘आशा’!

करोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीची साखळी शोधण्यासाठी उपयोग

करोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीची साखळी शोधण्यासाठी उपयोग

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

किराडपुरा भागात करोनाचे पाच रुग्ण. याच भागात फुरकान शेख आशा कार्यकर्ती म्हणून काम करतात. चांगल्या आणि वाईट यांची समज ठेवणारी व्यक्ती, असा या शब्दाचा अर्थ. ही समज फुरकान बाजीमध्ये जरा अधिकच. सारा मोहल्लाच त्यांना बाजी म्हणतो. गेली १७ वर्षे त्या या भागात ‘आशा कार्यकर्त्यां’ म्हणून त्या काम करतात. त्या म्हणाल्या,‘ अजूनही लोकांना वाटतं आम्ही विचारतो ती माहिती ‘एनआरसी किंवा एनपीआर’ घेतात. असाही समज आहे की, करोना रुग्ण शोधून दिला, की आम्हाला दोनशे रुपये मिळतात. म्हणून एकाच मोहल्ल्यातील व्यक्तींच्या चाचणी अधिक केल्या जात आहेत, असाही समज आहे. तो समज तोडत फुरकान शेख सतत काम करताहेत. त्यांनाही जीवाची भीती आहे. पण अजूनही लोक ऐकत नाहीत. अर्धा मोहल्ला रस्त्यावर असतो. हातावरचे पोट असणारे आणि दाटवाटीची वस्ती असल्याने या मोहल्ल्यात काम करणे अवघड असल्याचे त्या सांगतात.

पुण्याहून आलेल्या आरेफ कॉलनीतील तरुणाला करोनाची बाधा झाली. त्याच्या आजोबाला पुढे लागण झाली. ते मुलीच्या घरी जेवायला गेले होते. ती लागण पुढे गेली. जलाल कॉलनीपर्यंत तो धागा कसा पुढे सरकत जातो याची इत्थंभूत माहिती प्रशासनाला फुरकान बाजी कडून कळाली. अन्यथा संसर्ग नक्की कोणापासून कोणाला झाला आहे, हे कळलेचे नसते. त्यामुळे करोनाच्या लढाईत आशा कार्यकर्ती अधिक महत्त्वाची ठरते आहे. त्या सांगत होत्या, ‘एकाला करोनाची लागण झाली. त्यांच्याबरोबर नमाज अदा करणारे चौघे जण होते. त्या चौघांनी करोना चाचणी करून घ्यावी, असा त्यांचा आग्रह होता. त्या रोज त्यांना भेटत. नसेलही तो रोग. पण शक्यता तर आहे, हे समजावून सांगावे लागते. घरातील इतरांचे आयुष्य कशाला पणाला लावता, असे म्हटल्यावर ते तयार झाले. त्यामधील तिघांची चाचणी नकारात्मक आली.’ करोनाविरोधाच्या लढय़ात किराडपुरा, जलाल कॉलनी अशा भागात आरोग्य यंत्रणेलाही फुरकान बाजी महत्त्वाच्या वाटतात. माहिती घेताना उर्दू भाषेतून बोलणारा असेल तर अधिक सोपे होते. या भागात होणारी गर्दी आणि रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी भेट दिली. पण त्या वेळी फुरकान बाजी आवर्जून गेल्या. त्या असणे म्हणजे करोनाबाधितांची संपर्क साखळी कळण्याचा मार्ग, असे आता प्रशासनालाही वाटू लागले आहे. या अनुषंगाने बोलताना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीता पाडाळकर म्हणाल्या,‘ अल्पसंख्याक मोहल्ल्यामध्ये विश्वास कमावून काम करणाऱ्या मंडळींकडून करोनाबाधित रुग्णांचा वावर, संपर्क आलेल्या व्यक्ती याची साखळी करण्यास मोठी मदत होत आहे. आशा कार्यकर्तीचे काम त्यामुळेच खूप अधिक उपयोगी ठरत आहे.’ साथ रोगाच्या अशा वातावरणात फुरकान ‘आशा’ ठरत आहे.

खरी ‘आशा’

फुरकान शेख यांच्या  घरात एक मुलगा आणि पती असा परिवार. त्या घरी येतात तेव्हा भीती वाटते घरातील सदस्यांना. आता फुरकान यांनी स्वत:ची झोपण्याची खोली वेगळी केली आहे. दररोज बाहेरून आल्यावर अंघोळ करतात. स्वयंपाकही घरातील इतर सदस्यच करतात. सहसा नेहमीच्या वस्तूंना आपला हात कमी लागेल याची काळजी घेतात. नाकाला रुमाल बांधून मोहल्ल्यातील व्यक्तींना आरोग्याचे महत्त्व सांगणारी व्यक्ती लढा देणारी ठरू लागली आहे. आदेश निघतात सरकारी पण अंमलबजावणीमध्ये आणणारी कार्यकर्ती खरीच ‘आशा’ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 1:04 am

Web Title: furkan sheikh asha worker searching people close contact with covid 19 patients zws 70
Next Stories
1 Coronavirus : मराठवाडय़ात करोनाचे ४२ रुग्ण, सर्वाधिक रुग्ण औरंगाबादमध्ये
2 औरंगाबादेत सायंकाळनंतर पुन्हा कडक संचारबंदी
3 भाजी आणि धान्य बाजारात निम्म्यांनाच रोजगार
Just Now!
X