राजकारण्यांविरुद्ध टीका देशद्रोह ठरविण्याबाबत राज्य सरकारने काढलेले पत्रक हे लोकशाहीने प्रदान केलेल्या अधिकाराची मुस्कटदाबी असल्याचे सांगून या पत्रकाचा काँग्रेसच्या वतीने खासदार राजीव सातव यांनी तीव्र निषेध केला.
राज्य सरकारने काढलेल्या पत्रकाबाबत सातव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सत्तेवर आल्यावर भाजप सरकारने आपले खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर आलेल्या सरकारने हुकूमशाहीच्या दिशेने देशाची, राज्याची वाटचाल सुरू करून त्या दिशेने हे पाऊल टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी सर्व पंतप्रधान पत्रकारांना परदेश दौऱ्यावर सोबत घेऊन जात. परंतु मोदी यांनी पत्रकारांना परदेश दौऱ्यावर नेण्यासह त्यांच्याशी संवाद साधणे बंद केले आहे. ते आता संसदेतसुद्धा बोलत नाहीत. देवेंद्र फडणवीस सरकारचा मोदी सरकारच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाण्याचा हा प्रयत्न आहे. पण ही लोकशाहीची मुस्कटदाबी आहे, त्यामुळेच काँग्रेसच्या वतीने याचा तीव्र निषेध करीत असल्याचे सातव यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2015 1:20 am