करोनाच्या सावटाखाली यंदाच्या गणशोत्सवाचे स्वरुप असून काय करायचे आणि काय करायचे नाही, या प्रशासनाकडून घालून दिलेल्या अटी-शर्तीनुसार सार्वजनिक ठिकाणी मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल.

करोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्य़ातील ५७७ गणेश मंडळांनी यंदा मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय ग्रामीण पोलिसांना कळवला आहे. दरवर्षीप्रमाणे पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार असून गर्दी आणि करोनाबाबतचे नियम पाळण्याबाबत लक्ष ठेवण्यासाठी शहरात ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी यंदा करोनाची परिस्थिती पाहता मूर्तीची स्थापना न करण्याबाबत आवाहन केले होते. त्याला जिल्ह्य़ातील ५७७ मंडळांनी प्रतिसाद दिल्याचे ग्रामीण पोलीस मुख्यालयाकडून सांगण्यात आले. तर २१ ऑगस्टपर्यंत १३२ सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नोंदणी केल्याचीही माहिती आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करोना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय करावे आणि काय करू नये, याच्या सूचना जारी केल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी निर्जंतुकीकरण करावे, शारीरिक अंतर व मुखपट्टी लावण्याच्या संदर्भातील नियमांचे पालन करावे, सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणची गणेशाची मूर्ती चार फुटापेक्षा मोठी नसावी तर घरगुती मूर्ती २ फुटांच्या मर्यादेत असावी, मंदिरांमधील गणेशांच्या दर्शनाची व्यवस्था ऑनलाइन करावी, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्याबाबत जनजागृती करून आरोग्य तपासणी, रक्तदान आदी शिबिरे आयोजित करण्यासारखे उपक्रम राबवावेत, तर विसर्जनासाठी नदी, विहिरी, तलावांवर जाऊ नये, मिरवणूक एकत्रितरीत्या काढू नये, अशा सूचना केलेल्या आहेत.

पोलिस बंदोबस्त

पैठण, सिल्लोड शहर, वैजापूर येथे प्रत्येकी राज्य राखीव बल स्ट्रायकिंग फोर्सची एक प्लाटून कंपनी, कन्नड शहर, गंगापूर येथे दंगा काबू पथकाची प्रत्येकी एक प्लाटून, पोलीस अधीक्षक स्ट्रायकिंग फोर्स, अप्पर पोलीस अधीक्षक स्ट्राईकिंग फोर्स, नियंत्रण कक्ष राखीव अंतर्गत तीन दंगा काबू पथक, उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी असे सात, १८ पोलीस निरीक्षक, ३६ सहायक पोलीस निरीक्षक, ६६ उपनिरीक्षक, १२५७ पोलीस कर्मचारी, ३०० गृहरक्षकदलाचे जवान, एसआरपीएफची एक कंपनी, असे साधारण ग्रामीण पोलिसांच्या बंदोबस्ताचे स्वरुप राहणार असल्याचे सांगण्यात आले.

लातुरात यंदाचा गणेशोत्सव मंडपाविना

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात एकाही चौकात गणपती बसवण्यासाठी मंडप लावला जाणार नाही, असे आश्वासन विविध मंडळांच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. राजेंद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना दिले आहे. गतवर्षी लातुरात पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. त्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन न करता त्या मूर्ती दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला हजारो मूर्तीचे दान करून गणेश भक्तांकडून प्रतिसाद मिळाला. यंदा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ४ फूट व घरगुती गणेश भक्तांना २ फूट मूर्तीचे बंधन घालण्यात आले आहे. शहरातील गंजगोलाई व सुभाष चौक या दोन ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीस बंदी घालण्यात आली. विक्रेत्यांना मुखपट्टी आणि फेसशिल्डचा वापर बंधनकारक करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर इतरही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा गणेशोत्सवासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, एसआरपीएफच्या कंपन्या, ३५० गृहरक्षक दलाचे जवान, सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, कर्मचारी असे बंदोबस्त रचनेचे स्वरुप राहणार आहे. मिरवणुकांना परवानगी नाहीच. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही आवश्यक तेथे वापर केला जाईल.

– मीना मकवाना, पोलीस उपायुक्त