गणपतीबाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत शहरासह जिल्ह्यात गणरायाला उत्साहात निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांनी शहर दणाणून टाकले.
जि.प.च्या आवारातील विहिरीत विसर्जनाची व्यवस्था केली होती. गुलमंडी येथून सर्व मिरवणुका वाजतगाजत गेल्या. या वेळी अनेक मंडळांनी ढोलताशांच्या गजरात लक्ष वेधून घेतले. बहुतेक महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी पारंपरिक पद्धतीने मंडळांचे स्वागत केले. मिरवणुकांमध्ये शालेय मुले, तरुण-तरुणींचा लक्षणीय सहभाग होता. गुलालाची उधळण करीत व वाद्यांच्या निनादात मानाच्या कुलदैवत संस्थान गणपतीची मिरवणूक निघाली. त्यानंतर अन्य गणपती मिरवणुकीत सहभागी झाले. उशिरापर्यंत वाद्यांचा गजबजाट सुरू होता. सिडको, हर्सूल, वाळूज, बीड बायपास आदी भागात मंडळांनी उत्साहात मिरवणुका काढल्या. दुष्काळामुळे यंदा बहुतेक मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा केला. मात्र, विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक जल्लोष कायम होता. चोख बंदोबस्त तैनातीमुळे कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.