गणपतीबाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत नांदेड शहर व जिल्ह्यात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. रविवारी रात्री उशिरापर्यंत शांततेत व उत्साहात ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांनी अनेकांचे लक्ष वेधले.
शहर व जिल्ह्यात अडीच हजारांपेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली. सुमारे ११ दिवस विविध उपक्रम साजरे करण्यात आले. दुष्काळाची दाहकता व पावसाच्या लहरीपणामुळे अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. अखेरच्या दिवशी मात्र बाप्पाला निरोप देताना भक्तांमध्ये कमालीचा उत्साह होता. गोदावरी, आसना, मांजरा, मन्याड, पनगंगा, सीता या प्रमुख नद्यांमध्ये आवश्यक पाणीपातळी नसल्याने त्या-त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. नेहमीच्या परंपरेला फाटा देत बहुतांश गणेश मंडळांनी पर्यायी जागेवर विसर्जन करण्यास प्राधान्य दिले.
नांदेड महापालिकेच्या वतीने गोदातीरी, डंकीन येथे विसर्जनासाठी मोठा खड्डा तयार केला होता. अनेक सार्वजनिक मंडळासह भक्तांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रोत्साहन देत कृत्रिम खड्डय़ात विसर्जन केले. यंदा पोलिसांनी डीजेला परवानगी नाकारल्याने काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आळवला. सकाळी दहापासून शहरातील वेगवेगळ्या भागात मिरवणुका सुरू झाल्या.
गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.., एक – दोन – तीन -चार, गणपतीचा जयजयकार अशा घोषणा देत ढोलताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमध्ये तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. शहरात आसना (पासदगाव-सांगवी) व गोदावरी नदीच्या (गोवर्धनघाट-नावघाट) किनारी रात्री उशिरापर्यंत श्री विसर्जन पार पडले. पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांच्या आदेशानुसार दोन दिवसांपासून नाकाबंदी करण्यात आली होती. शेकडो समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. रविवारी पहाटे पाचपासून सर्वच भागात बंदोबस्त तनात होता.