शहरासह जिल्हाभरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. अखेरच्या दिवशी परभणीतील गणेश मंडळाने सजीव देखावे सादर करून उत्सवाचा शेवट उत्साहात आणि चतन्यपूर्ण वातावरणात केला.
यंदा गणेशोत्सवात देखावे नसल्याने भक्तांचा हिरमोड झाला होता. गणेशोत्सव काळात देखावे करण्याची स्पर्धा घेतली जाते. उत्कृष्ट देखावे तयार करणाऱ्या मंडळांचा गौरव केला जातो. गणेश महासंघाच्या वतीने उत्सव काळात आणि मिरवणुकीत देखावे सादर करण्याची स्पर्धा घेतली जात होती. यंदा दुष्काळाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा झाला. कुठेही मोठा आवाज नाही, तसेच जल्लोष नाही. अशा वातावरणात उत्सवातील दहा दिवस निघून गेले.
अनंत चतुर्दशीला दिवसभर गणेश मंडळांकडे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ‘श्री’ विसर्जनाला प्रारंभ झाला. घरात बसवलेल्या गणरायाला नागरिक विसर्जनासाठी घेऊन जात होते, तर रस्त्यावरील गणेश मंडळे वाजतगाजत मिरवणूक काढून विसर्जनाला नेत होते. शहरातील मोजक्याच दहा मंडळांनी शिवाजीमहाराज पुतळा ते शिवाजी चौक या दरम्यान मिरवणूक काढली. या दहा मंडळांनी वेगवेगळे सजीव देखावे सादर केले होते. स्टेशन रस्ता माग्रे ही मिरवणूक पुढे नारायणचाळ, गांधी पार्क रस्त्याने गेली.पर्यावरण, वृक्षारोपण आदी संदेश मिरवणुकीदरम्यान असलेल्या देखाव्यांद्वारे देण्यात आले. मिरवणुकीदरम्यान खंडोबा, आदिवासी नृत्य, असे विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करण्यात आले. गांधी पार्क, शिवाजी चौक या भागात मिरवणुका आल्यानंतर देखावे तसेच सांस्कृतिक आविष्कारांचा आस्वाद घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती. उत्साहात पार पडलेल्या या मिरवणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. चोख बंदोबस्तामुळे सर्वत्र शिस्तीत मिरवणूक चालली. भक्तांचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी मंच उभारले होते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महापालिका अशा विविध मंचांवरून भक्तांचे स्वागत केले जात होते.
वाहतूक पोलिसांचे महत्त्व सांगणारा आणि ऊन, पाऊस, वारा यामध्ये रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहतूक पोलिसांविषयी देखावाही या वेळी सादर करण्यात आला. जवळपास सर्वच मंडळांनी सजीव देखावे सादर केले. देखाव्याच्या सोबतीला ढोलताशांचा गजरही होता. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. शहराच्या इतरही भागातून गणेश मंडळे वाजतगाजत विसर्जनासाठी जात होती. महापालिकेच्या वतीने आठ ठिकाणी मूर्ती संकलन केले जात होते. शहराबाहेरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची व्यवस्था केली होती.