गणेशोत्सवाचे दहाही दिवस पाऊस न पडल्यामुळे लातूरकर चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे ‘पाऊस पडू दे’ अशी विनवणी करीत गणेशभक्तांनी बाप्पाला उत्साहात निरोप दिला. दरम्यान, मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरलेल्या अमर मंडळाने यंदाही वर्षभर झालेल्या कारकिर्दीवर केलेल्या टिप्पणीचे फलक झळकावले. विकासाच्या नावावर लातूर झाले भकास, डालडा फॅक्टरी बंद, जवाहर सूतगिरणी बंद, साखर कारखान्यांच्या अट्टहासामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळेना, काँक्रिटचे जंगल वाढले, वाहतुकीची कोंडी, वाढते अपघात, पाण्याची भीषण समस्या, लातूरकरांना केवळ स्वप्नाचे इमले राजकारण्यांनी दाखवले, मात्र मूलभूत सुविधाही मिळाल्या नाहीत.. अशा मजकुराने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. 28latur4
या बरोबरच खोटय़ा विकासाचा हव्यास लातूरची बाजारपेठ झाली भकास या फलकावरील मजकुराला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘बायकोपेक्षा खुर्ची प्यारी’ या फलकानेही लक्ष वेधून घेतले. बाजार समिती निवडणुकीत आपला अर्ज छाननीत बाद होऊ नये, या साठी काही उमेदवारांनी पत्नीपासून आपण वेगळे राहात आहोत असे लेखी दिले. ‘जन्मोजन्मीचे नाते तोडून पाच वर्षांंच्या सत्तेचा हव्यास धरी, बायकोपेक्षा खुर्ची प्यारी, लातूर पॅटर्नची ही तऱ्हाच न्यारी’ अशी मार्मिक टिप्पणी या फलकातून करण्यात आली. दुष्काळाचा संदर्भ घेत
‘नाटकी नेत्यांपेक्षा अभिनेते बरे, कधी माणसांना तर कधी जनावरांना वेठीस धरून राजकारणी मोर्चाचे नाटक करू लागले, शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झाले. मात्र, त्याचे अश्रू पुसण्यासाठी राजकारणी मागे राहिले. अभिनेते मात्र हेलावले. नाना, मकरंद, अक्षय मदतीला सरसावले,’ या फलकानेही सर्वाना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.
शहराच्या चारही दिशांना मिरवणुका काढून विविध ठिकाणी बाप्पांच्या विसर्जनाची व्यवस्था महापालिकेने केली होती. गंजगोलाई परिसरातून जाणाऱ्या मुख्य मिरवणुकीचा मान भारत रत्नदीप आझाद मंडळास होता. या मंडळाने पाणी वाचवण्याचे आवाहन केले, तेच मिरवणुकीतही केले. प्रभात मंडळ, अमर मंडळ, ज्ञानदीप मंडळ, जयिहद मंडळ, शिवतरुण मंडळ, वीर बाजीप्रभू मंडळ व महालक्ष्मी या मंडळांनी पाणी प्रश्नावर भर दिला. झाडे जगवा पाणी वाचवा असे आवाहन गणेशभक्तांनी विसर्जन मिरवणुकीत केले, तसे देखावेही करण्यात आले.
गंजगोलाई येथे महापालिका व भांडी असोसिएशनच्या वतीने गणेशभक्तांचे स्वागत करण्यात आले, तर सुभाष चौकात सुभाष चौक मित्रमंडळ व सार्वजनिक मध्यवर्ती गणेश मंडळ यांच्या वतीने गणेशभक्तांचे स्वागत करण्यात आले. दुपारी २ वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. सोमवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी औसा हनुमान गणेश मंडळाच्या गणपतीचे सिद्धेश्वर कुंडात विसर्जन करण्यात आले.
औसा रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक सायंकाळी ४ पासून सुरू झाली व रात्री १२ वाजता संपली. बांधकाम भवनच्या पाठीमागील विहिरीत विसर्जनाची सोय करण्यात आली होती. बार्शी रोड, कव्हा रस्ता या मार्गावरही उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. बालाजी मंदिर परिसराजवळ कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. यात सुमारे २५० गणेशभक्तांनी मूर्तीचे विसर्जन केले. प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दुष्काळामुळे गणेशभक्तांचा या वर्षी उत्साह तुलनेने कमी होता.