महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संयुक्त कारवाईत दोघांना पकडले

औरंगाबाद : महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना औरंगाबादेत बनावट मतदार ओळखपत्र तयार करून देणारी टोळी सक्रिय असल्याचे गुरुवारी उघडकीस आले. निवडणूक विभागाचे तहसीलदार शंकर लाड यांच्यासह इतर अधिकारी व पुंडलिकनगर पोलिसांच्या पथकाने संयुक्त रीत्या कारवाई करत गजानन कॉलनीतील मातोश्री डिजिटल या दुकानात छापा मारला. या प्रकरणी नायब तहसीलदार रेवणनाथ सीताराम ताठे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक धनाजी आढाव यांनी दोन तरुणांना अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.

हरीश धुराजी वाघमारे (वय २२) व नवनाथ भक्तदास शिंदे (वय २६) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. हरीश वाघमारे याचे गजानन कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिरासमोर मातोश्री डिजिटल नावाचे दुकान आहे. हरीश याने त्याच्या संगणकात  प्रिन्ट्सकार्ड डॉट ऑनलाइन हे संकेतस्थळ घेतले आहे. त्याद्वारे बनावट ग्राहकाकडून मूळ ओळखपत्राचा डाटा घेऊन तो निवडणूक विभागाचे अधिकृत संकेतस्थळ चोरून मिळवलेल्या पासवर्डच्या आधारे उघडायचा. त्यावर बनावट ग्राहकाची माहिती नोंदवायची व ती जशीच्या तशी नक्कल करून पुन्हा प्रिन्ट्सकार्ड डॉट ऑनलाइन संकेतस्थळावर घ्यायचा. मात्र, त्यावर बनावट ग्राहकाचे छायाचित्र यायचे नाही. तेव्हा बनावट ग्राहकाकडून छायाचित्र मागवून घ्यायचा किंवा जागेवरच काढून ते पुन्हा घेतलेल्या संकेतस्थळावरील ओळखपत्रावर चिटकवायचा. त्यातून हुबेहूब निवडणूक ओळखपत्राची प्रत मुद्रण यंत्रातून निघायची. ही माहिती हरीश याने तहसीलदार लाड यांना प्रात्यक्षिकासह करून दाखवली. मात्र, या बनावट मतदार ओळखपत्रावर नोंदणी अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसायची. अशी डिजिटल स्वाक्षरी तो नक्कल करून अथवा बनावट स्वहस्ताक्षरात करून ओळखपत्रावर संगणकीय कौशल्याने चिटकवायचा. हे ओळखपत्र स्वत:च्या संगणकातून हनुमान चौकातील महा-ई-सेवा केंद्रावर पाठवले जायचे. तेथून बनावट ओळखपत्र दिले जायचे. महा-ई-सेवा केंद्राचा नोकर

नवनाथ शिंदे याच्या दुकानातून स्मार्ट कार्ड बनवण्यात येणारे साहित्य, संगणक, मुद्रण यंत्र, असा ३९ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

भारतीय निवडणूक आयोगाने बनावट ग्राहकास जारी केलेल्या मूळ ओळखपत्रामध्ये प्रिन्ट्स डॉट ऑनलाइन संकेतस्थळाच्या आधारे नवीन छायाचित्र दिल्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियम व अटींचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर क्राइम विभागाकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणी किती जणांना बनावट ओळखपत्र दिले, याचीही माहिती घेण्यात येत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.

शासकीय संकेतस्थळाचा पासवर्ड कसा?

निवडणूक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ उघडण्याचा पासवर्ड हरीश याने मिळवल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. मात्र, त्याने तो पासवर्ड कसा मिळवला, असा एक प्रश्न निर्माण झाला आहे. हरीश वाघमारे हा थेट जाणाऱ्याचेही कुठल्याही माहितीची शहानिशा न करता थेट ओळखपत्र तयार करून देत असल्याचीही माहिती आहे.