News Flash

‘गंगाखेड शुगर’च्या रत्नाकर गुट्टेंचा ‘प्रताप’

रोपी गुट्टे यांचा जामीन अर्ज बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी फेटाळला.

(संग्रहित छायाचित्र)

मृत शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलल्याचे पुरावे

औरंगाबाद : रत्नाकर गुट्टे अध्यक्ष असलेल्या गंगाखेड शुगर या साखर कारखान्यात दोन हजार २९८ शेतकऱ्यांच्या नावावर ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलून केलेल्या गैरव्यवहारप्रकरणी आरोपी गुट्टे यांचा जामीन अर्ज बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी फेटाळला.

या गैरव्यवहारातील आरोपींनी घातलेला घोळ किती गंभीर आहे, याची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. ती ‘लोकसत्ता’ला मिळाली असून मृत शेतकऱ्यांच्या नावेही पीक कर्ज उचलल्याचे जबाब मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी दिले होते. त्यातील काही जबाब धक्कादायक आहेत.

पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथील केशव त्र्यंबकदास धवन यांच्या नावे नागपूर येथे आंध्रा बँकेच्या धरमपेठ शाखेतून दोन लाख ६० हजार ९१० रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. केशव धवन यांना ८ मार्च २०१४ रोजी अपघात झाला. डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना नांदेड येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर १७ मार्च २०१४ पर्यंत उपचार करण्यात आले. पुढे सिकंदराबाद येथे ते २४ मार्चपर्यंत रुग्णालयात दाखल होते. त्यांचा मृत्यू ३ डिसेंबर २०१४ रोजी झाला. मात्र, या मृत शेतकऱ्याच्या नावे २८ मार्च २०१४ रोजी गंगाखेड शुगरने दोन लाख ६० हजार ९१० रुपयांचे पीक कर्ज घेतले आणि ११ जुलै २०१७ रोजी त्या कर्जाची परतफेड करण्यात आली. पीक कर्ज घेताना केशव धवन यांची खोटी कागदपत्रे तयार केली गेली. निवडणूक ओळखपत्र, साताबाराची नक्कल बेकायदा मिळविण्यात आल्याचा जबाब त्यांच्या पत्नी सुनीता धवन यांनी परभणी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक के. पी. सुलभेवार यांच्याकडे दिला होता.

दुसरे प्रकरणही असेच आहे. गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील शेतकरी सदाशिव सातपुते यांचा छतावरून पडल्याने डोक्याला मार लागून १० डिसेंबर २०१३ रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची पत्नी पद्मिनी सातपुते यांनी स्टेट बँक हैदराबादमधील त्यांचे बँक खाते बंद केले. २०१४ मध्ये पतीच्या नावावर असणारे युको बँकेच्या दोन लाख रुपये कर्जाची परतफेड करण्यात आली. पण ‘गंगाखेड शुगर’ने त्यांच्या नावेही कर्ज उचलले. मृत शेतकऱ्याच्या पत्नीची तक्रार नसली तरी आंध्रा बँकेतून कर्ज काढण्यासाठी त्यांचे पती कधीही नागपूरला गेले नाहीत, असे त्यांनी जबाबात म्हटले आहे.

परळी तालुक्यातील पाडोळी या गावातील विनोदकुमार कराड यांचा मृत्यू २०११ मध्ये झाला आणि ‘गंगाखेड शुगर’ने २०१२ मध्ये त्यांच्या नावे दीड लाख रुपयांचे कर्ज उचलले. वास्तविक ऊस लागवडीसाठी त्यांनी कारखान्याकडे कागदपत्रे दिली होती. कर्ज मागणीच्या अर्जावर वडिलांनी सही केली होती की नाही, हे त्यांचा मुलगा सोनू कराड यांना सांगता आले नाही. मात्र, कागदपत्रावरील छायाचित्रे, सातबारा ही कागदपत्रे कारखान्याला दिली होती. २ एप्रिल २०११ रोजी निधन झाल्यानंतर २०१२ मध्ये कर्ज उचलल्याची कागदपत्रे गुन्हा अन्वेषण विभागाने न्यायालयात सादर केली होती. पदवीपर्यंत शिकलेल्या सोनू कराड यांचा जबाब गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक डी. एस. डोलारे यांनी नोंदवलेला होता.

मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज बँकेच्या नागपूर शाखेतून मंजूर करण्यात आले. हे घडवून आणण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केल्याचा दावा गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर केला होता. खरे तर ज्या शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतले आहे, त्यांची संमती घेऊन अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित असते, पण तसे घडले नाही. सातबारा नमुने जुने असणे, ना-हरकत प्रमाणपत्र नसणे, अशा त्रुटी असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणांची पडताळणी न करता बँक खाती उघडली. साधारणत: दीड हजार बचत खात्यांवर बळजबरीने सह्य़ा करून घेतल्या. ज्यांना कर्ज दिले, त्या शेतकऱ्यांना आम्ही पाहिले नाही. मूळ कागदपत्रांची पडताळणी केली नाही. केवळ वरिष्ठांनी सांगितले म्हणून आम्ही हे काम केले, असा जबाब मनोज भगवान जुगसेनिया यांनी दिला. आंध्रा बँकेच्या अकोला शाखेत तेव्हा ते प्रबंधक म्हणून काम करत होते. या गुन्ह्य़ाचा तपास करणारे अप्पर पोलीस अधीक्षक सी. जी. कांबळे यांनी हा जबाब नोंदविला होता.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे साटेलोटे

क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावापोटी अशी कर्जप्रकरणे मंजूर केल्याचा जबाब असलेली कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली होती. बँक अधिकाऱ्यांनी आणि साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी मिळून केलेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती वाढत आहे. या साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, असे न्यायालयात फिर्यादीचे वकील सांगत असल्यामुळे गुट्टे यांचा जामीन अर्ज नाकारण्यात आला. मृत शेतकरी नाहीच तर अनेक अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याचे हे प्रकरण पीक कर्ज वाटप कसे होते, याचा दाखला देणारे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 12:12 am

Web Title: gangakhed sugar factory president ratnakar gutte bail application rejected zws 70
Next Stories
1 दुग्ध व्यवसायातील नफाही आटला
2 संरक्षण क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल, पण..
3 अर्ध्या मराठवाडय़ात पावसाची हजेरी
Just Now!
X