15 December 2018

News Flash

अजूनही कचरा रस्त्यावरच

 शहरातील शहागंज, लोटाकारंजा व क्रांती चौक भागात सर्वाधिक कचरा आहे.

शहरातील कोळसा गल्लीतील कचऱ्याला लागलेल्या आगीत एक कार जळून खाक झाली.- छाया - अदनान रफी)

साठवणुकीसाठी खासगी जागेचा पर्याय; कचऱ्याला आग लावल्याने चारचाकी जळाली

शहरातील ‘कचराकोंडी’ कायम असून, अजूनही ३४०० मेट्रिक टनापेक्षा अधिक कचरा रस्त्यावर असेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. दरम्यान, रविवारी रात्री पुंडलिकनगर पोलीस ठाण्याजवळील गोकुळ स्वीट्सजवळ कचऱ्याला आग लावण्यात आली. तर शहरातील कोयला गल्ली भागात कचऱ्याला आग लागल्यामुळे एक चारचाकी गाडी अक्षरश: जळून खाक झाली. साचलेल्या  कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक प्रभागात किमान एक ते दीड एकर जागेची आवश्यकता आहे. तशा काही जागांचा शोध सुरू झाला आहे. एका एकरात ८० टन ओला कचरा टाकल्यास त्याचे खत तयार होण्यासाठी ४५ दिवस लागतात. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रियेसाठी शहराबाहेर १० ते १२ एकर जागा नव्याने विकत घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतली.

शहरातील शहागंज, लोटाकारंजा व क्रांती चौक भागात सर्वाधिक कचरा आहे. तो काढण्यासाठी कोठे प्रक्रिया केंद्र उभे करता येतात, यासाठी जागांचा शोध सुरू आहे. विविध ठिकाणी कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाडय़ांना आज नागरिकांनी पुन्हा विरोध केला. विशेषत: प्रक्रिया करण्यासाठी पत्र्याचे शेड टाकताना हा विरोध झाल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी कबूल केले. शहरातील स्वातंत्र्यसैनिक कॉलनीत कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाडय़ांना नागरिकांनी विरोध केला. या भागात जिल्हा परिषदेचे मोठे मैदान आहे. मांसाहारी कचऱ्यातील ‘चिकन’शी संबंधित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘आलाना’ या कंपनीबरोबर बोलणी सुरू असून त्यांना प्रक्रिया करण्यासाठी काही रक्कमही महापालिकेकडून दिली जाण्याची शक्यता आहे. तशी बोलणी सुरू असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. त्यांनी कचऱ्यातील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. नऊ प्रभागांमध्ये आवश्यक ती यंत्रसामग्री ‘जे. एम. पोर्टल’वरून खरेदी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जावी, अशी विनंती विभागीय आयुक्तांना केली. नऊ प्रभागांमध्ये ५६ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रसामग्री घ्यायची की, २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशीन घ्यायची याविषयी विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. शुक्रवारी राज्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी कचऱ्याची विल्हेवाट शहरातील महापालिकांच्या जागांमध्येच लावण्यासाठी नऊ प्रभागांमध्ये प्रक्रिया केंद्र उभे करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नियुक्त केलेल्या नऊ मुख्याधिकाऱ्यांनी शहरात जागांची पाहणी केली. काही ठिकाणी ओला कचरा टाकण्यासाठी खड्डेही करण्यात आले. मात्र, शहरातल्या सर्व भागांमध्ये अशी व्यवस्था नसल्यामुळे शनिवारी आणि रविवारी साडेसात ते आठ हजार टन कचरा साचलेला होता. त्यातील काही कचऱ्यावर प्रक्रिया झाली आहे, असे सांगण्यात आले. मात्र, बहुतांश कचराकुंडय़ा भरून वाहिलेल्या आहेत. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या कचऱ्याला आग लावली जात आहे. त्यामुळे धूर होत असून प्रदूषणाची पातळीही वाढण्याची शक्यता आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. कचऱ्याला आग लावू नका, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

खासगी जागांचा शोध

शहरात ओला कचरा टाकण्यासाठी महापालिकेच्या जागा अपुऱ्या पडतील, असा अंदाज आहे. १२३ गुंठेवारीच्या भागांमध्ये कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली असून दुभाजकांवर कचरा टाकला जात आहे. पुंडलिकनगर भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती कचरा टाकला जात असल्याने नागरिकांमध्ये राग आहे. आज तो काहीअंशी काढण्यात आला. मात्र, या भागात कचरा होऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी किमान १० ते १५ एकराची सलग जमीन आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. सध्या मलनिस्सारण केंद्राच्या भोवतालच्या जागांचा पर्याय शोधला जात आहे. मात्र, त्या पुरेशा नसल्यामुळे खासगी जमीन खरेदी करता येते का, असाही पर्याय विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही जागा कोणत्या भागात हे सांगण्यास प्रशासनाने नकार दिला.

First Published on March 14, 2018 3:01 am

Web Title: garbage issue in aurangabad aurangabad municipal corporation