गारपीटच्या काळात विषुववृत्तावरून वाहणारे विक्षोपीय वारे हे ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने वाहत होते. त्यावेळी तापमान उणे ७० अंशात होते. अशावेळी वातावरणात एवढा गारठा असतो की त्याचे पाणी होऊन पाऊस पडणे, ही प्रक्रियाही गोठते. विक्षोपीय वारे नेमके ते विदर्भ-मराठवाडय़ावरून वाहात होते. ते खरे तर उत्तर भारताच्या पट्टय़ावरून वाहणे अपेक्षित होते. अशा घडामोडी  सूर्यावरील कमी होत जाणाऱ्या डागांमुळे घडतात, असे निरीक्षण येथील महात्मा गांधी मिशनच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल आणि अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी नोंदवले आहे.

मध्यभारतातून वाहणाऱ्या वाऱ्यांचे केंद्रस्थानी मराठवाडा व विदर्भ होता. परिणामी येथे गारपीट झाली. समुद्र तटांकडून होणारे बाष्प व पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांचा संयोग झाल्याचे ठिकाण हे मराठवाडा-विदर्भ होते, हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा या सर्व घडामोडींचा अभ्यास, त्याची भाषा लक्षात आली पाहिजे, असे मतही डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले.

अविरत सूर्याचा अभ्यास

सूर्याच्या प्रत्येक क्षणांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांची मोठी फौज काम करीतआहे. गॉंग (ग्लोबल ऑसिलेशन नेटवर्क ग्रुप) ही संस्थाही पूर्णवेळ काम करते आहे. जगभरात असे सहा केंद्र आहेत. एक भारतात उदयपूर येथे आहे. यातून सूर्याच्या प्रत्येक क्षणा-क्षणांच्या हालचाली टिपल्या जातात. त्याची नोंद ठेवली जाते. याचा उपयोग वातावरणातील अभ्यासासाठी करता येऊ शकतो.

पुढील काळात उन्हाळा सुसह्य़

सूर्याचे ऊर्जास्रोत पृथ्वीपर्यंत पोहोचत नसतील तर वैश्विक किरणांचा मारा वाढतो. त्यामुळे विषुवृत्तीय भागात ढग वाढतात. परिणामत पृथ्वीचे तापमान कमी होते. दक्षिण व उत्तर ध्रुवीय भागातील प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी सुरू होते. तर समशीतोष्ण प्रदेशावरती अवकाळीसह गारपीटही होताना दिसते. येत्या काळात थंडीचा कार्यकाळ वाढणार आहे. तर उन्हाळ्याचे दिवस कमी होतील. सूर्य आग ओकणे वगैरेसारखी परिस्थिती नसेल. नागपूर, चंद्रपूर भागात हवेतील कार्बन, धुलिकणांमुळे तापमान अधिक.

हवामान केंद्रांचे विकेंद्रीकरण हवे

देशात जिल्हापातळीसह ४५० ते ५०० हवामान केंद्र आहेत. मात्र त्यांना कोणताही डाटा देण्याची किंवा डाऊनलोड करण्याची परवानगी नाही. केंद्रांचा वापर संशोधनासाठी किंवा अहवाल छापण्यापलिकडे होत नाही. सर्व नियंत्रण दिल्लीतून होत आहे. त्यासाठी स्थानिक हवामान केंद्रांना अधिकार दिले पाहिजेत. तेथून दररोजची माहिती अगदी एक-एक मिनिटांच्या टिपलेल्या घडामोडी पोहोचवता आल्या तर हवामानाचा अंदाज येऊ शकतो. हवामान केंद्र सक्षम केली तर रोजगारही निर्मिती होईल व वैज्ञानिकांनाही जागा तयार होतील, असे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

गारपीट युरोपातही

हवामानातील बदलामुळे होणाऱ्या गारपीटचा प्रश्न युरोपातही आहे. गारपीट होत असते हे वास्तव तेथील शेतकऱ्यांनी स्वीकारलेले आहे. तेथील शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी प्लॅस्टिकच्या आवरणाचा वापर करतात.

सरकारी अनास्थाही ‘उणे’

दुष्काळ आणि गारपीट याची काही संगती आहे का, याचा अभ्यास करण्याची गरज पर्यावरण तज्ज्ञांतून होत आहे. या अनुषंगाने अतुल देऊळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हवामानातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी सरकारी पातळीवरील अनास्थाच ‘उणे’मध्ये गेलेली आहे. सरकारकडून गेल्या काही वर्षांत काही एक पावले उचलली गेली नाहीत. काँग्रेसचे सरकार असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर हा विषय मांडला होता. भाजप सरकारच्या सर्वोच्च व्यक्तीपर्यंत हे मत पोहोचवले आहे, पण कोणीही गांभीर्याने घेत नाही.

झालेले नुकसान

  • ११ फेब्रुवारी रोजी जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील १८ तालुक्यांमध्ये ५२ हजार ९९६ हेक्टर पिके बाधित. जखमी व्यक्ती एक तर मृत व्यक्ती दोन. दगावलेली जनावरे १९.
  • १२ फेब्रुवारी रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्य़ातील २० तालुक्यात गारपीट. ५५ हजार ५४० हेक्टर क्षेत्र बाधित. जखमी व्यक्ती १६ तर एकाचा मृत्यू. तर २७ जनावरांचा मृत्यू.