निधीअभावी घरकूल योजनेचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये तब्बल ३ हजार ८६९ घरकूल मंजूर झाले होते. निधीचे वाटप होऊन कामे सुरू झाली. दुसऱ्या हफ्त्यासाठी विलंब झाला. २०१६-१७ चे आíथक वर्ष सुरू झाले. पूर्वीचीच कामे अपूर्ण आहेत. २ कोटी ७८ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.
पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे अतिरिक्त ठरलेल्या ७५० घरकुलांची कामे करण्यास राजी झालेल्या िहगोली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला यातील निधी अद्याप मिळाला नाही. त्यामुळे यंत्रणेची चांगलीच कोंडी झाली आहे. २०१३ या आíथक वर्षांत असा प्रकार घडला होता. त्यामध्ये ५८८ घरकुले मंजूर केली होती. एका घरकुल बांधकामासाठी ६८ हजार ५०० निधी खर्च अपेक्षित होता. त्यासाठी ४.०२ कोटींची आवश्यकता होती. त्यामध्ये केंद्र शासनाचे १ कोटी २६ लाख मिळाले. व्याज व खर्चीत निधीतून १६.१ लाख रुपये उभे राहिले. तर आता केंद्राचा ७१ लाख व राज्याचा वाटा ४३ लाखांचा अद्याप मिळणे बाकी आहे.
घरकुलांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून वारंवार प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र निधी न मिळाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बठकीत त्यावर चर्चाही गाजली. परंतु निधीच्या मागणीचे प्रस्ताव पाठवून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष झाले. लोकप्रतिनिधींनी आवश्यक त्या निधीची माहिती घेतली. केंद्र शासनाच्या वाटय़ाचे २०.२१ कोटी ऐवजी २०.६९ कोटी मिळाले. मात्र, राज्य शासनाकडून अपेक्षित १६.४४ पकी १३.६६ कोटी प्राप्त झाले. अद्यापही आवश्यक २ कोटी ७८ लाखांच्या निधीची प्रतीक्षा आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेत ४ कोटी ३७ लाख रुपये पंचायत समित्यांना वितरित करण्यात आले होते. त्यामुळे यातील बहुतांश कामे अंतिम टप्यात आली असली तरी सुमारे १ हजार घरकुलांच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे चित्र पहावयास मिळते. यापुढे जुन्या कामाचे व्यवहारही ऑनलाईन होणार आहे.