‘फोडा आणि राज्य करा’ ही इंग्रजाची नीती वापरून भाजप राज्य करीत आहे. त्यांचा तो अजेंडा आहे अशी सणसणीत टीका करीत राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बालकांचे मृत्यू ही एक प्रकारची हत्याच असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी पदावरून पायउतार व्हावे, असेही म्हटले. औरंगाबाद येथे इंदिरा गांधी जन्मशताब्दी सोहळय़ानिमित्त आयोजित राज्यातील पहिल्या कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी ते औरंगाबाद येथे आले होते. कार्यक्रमापूर्वी पत्रकार बैठकीमध्ये ते बोलत होते.

काँग्रेस जर बदलली नाही, तर तिचे अस्तित्व राहणार नाही, अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले होते. त्याबाबत गुलाम नबी आझाद यांना विचारले असता, ‘असेच वक्तव्य भाजपमध्ये एखादय़ा नेत्याने केले असते, तर त्याला कारागृहाची हवा खावी लागली असती. मात्र, आमच्या पक्षात लोकशाही आहे म्हणून स्वतंत्रपणे बोलता येते,’ असे ते म्हणाले. पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्यापासून नरेंद्र मोदी यांनी केलेली विधाने तपासली, तर अनेक घोषणा समोर येतात. दहा कोटी युवकांना नोकरीचे आश्वासन त्यांनी दिले होते. सत्ता येऊन तीन वष्रे झाली आहेत. पण, सव्वातीन लाख बेरोजगारांनाही नोकरी मिळाली नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभावाचाही सरकारला विसर पडला. कारण त्याचा अजेंडा वेगळा आहे. या नीतीच्या विरोधात काँग्रेस लढेल, कारण इंग्रजाशी देखील काँग्रेसने दोन हात केले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, या काळात विद्यार्थी मरतातच, असे म्हणणे कसे गर आहे. याची तपशिलाने मांडणी केली. गोरखपूर मतदारसंघात उभारण्यात आलेल्या विविध आरोग्याच्या सोयींमुळे या भागात मुलांना होणारा आजार कमी झाला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री पद सांभाळले असल्याने किमान मला तरी वेडय़ात काढता येणार नाही, असे ते सांगत गुलाम नबी आझाद म्हणाले, जुने आकडे सांगून केला जाणार बचाव चुकीचा आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याचे माहीत असूनही कारवाईबाबत राज्य सरकारने तसेच रुग्णालय प्रशासनाने कमालीचा निष्काळजीपणा केला. त्यामुळेच मुलांचा मृत्यू झाला. या पत्रकार बैठकीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, कल्याण काळे यांची उपस्थिती होती.