14 December 2019

News Flash

परतीच्या पावसाच्या पट्टय़ात जीनिंग व्यवसाय अडकला

मराठवाडय़ात साधारण दीडशेपेक्षा अधिक जीनिंग व्यवसायाची यंत्रणा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बिपीन देशपांडे

परतीच्या पावसामुळे कापसासह सर्वच पिकांचे नुकसान झाले. सरासरीत कापूस लागवडीत सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरने घटलेले क्षेत्र, उत्पादनात झालेली घट व त्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर असलेली मंदीसदृश छाया, आदी अडचणींच्या गर्तेत सापडलेल्या जीनिंगचा पट्टा सुरू होण्यावर त्यामुळे यंदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे व्यावसायिक कापूस खरेदी करण्यास अनुत्सुक आहेत, तर दुसरीकडे सरकारी पातळीवरही खरेदी केंद्र इतक्यात सुरू होतील, अशी शक्यता धूसर आहे.

मराठवाडय़ात साधारण दीडशेपेक्षा अधिक जीनिंग व्यवसायाची यंत्रणा आहे. बहुतांश जीनिंग या जालना, सिल्लोड आदी परिसरात आहेत. त्यातही आता तालुकास्तरावरही जीनिंग झालेल्या असून त्या मध्य प्रदेशातील व्यावसायिकांनी चालवण्यासाठी घेतलेल्या आहेत. विभागीय कृषी संचालक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ ऑगस्ट २०१९ पर्यंत मराठवाडय़ात ८७.६४८ टक्के क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या १७ लाख ७६ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रापकी १५ लाख ५७ हजार २०४.१६ हेक्टरवरच कापसाची पेरणी झालेली होती. सुरुवातीच्या पावसावर पीक चांगले आलेले होते. मात्र, परतीच्या पावसाने कापसासह इतरही पिकांचे नुकसान झाले. उत्तमरीत्या आलेला कापूसही भिजला. शेतकऱ्यांच्या हाती आता फारसा कापूस नाही.

साधारण १ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी होणे अपेक्षित असते. मात्र, अजूनही जीनिंग व्यावसायिक कापूस खरेदी करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. सरकारी यंत्रणेकडूनही काहीच हालचाल नाही. सरकारचा हमीदर पाच हजार ५५० प्रतिक्विंटल असला तरी जागेवरच रोखीने कापूस खरेदी करणाऱ्या जीनिंग व्यावसायिकांना ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांपेक्षा अधिकच्या दराने कापूस खरेदी करणे परवडणारे नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. जीनिंग व्यावसायिकांना वीज देयकाच्या दरात एक रुपया युनिटची सवलत देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. वीजदेयकाचा प्रश्न, सेन्ट हा कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील डॉलरमधील दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसांच्या गाठीला फारशी नसलेली मागणी, निर्यातीचे धोरण आदी कारणांमुळे अद्याप कापूस खरेदी सुरू होऊ शकली नाही, असे जीनिंग व्यावसायिक ओंकार खुप्रे यांनी सांगितले.

कापूस दरामुळे खरेदीदार अनुत्सुक

यंदा जीनिंगची यंत्रणा कधी सुरू होईल, हे सांगता येणार नाही. व्यावसायिकांना ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० पेक्षा अधिकच्या दराने कापूस खरेदी परवडणारी नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचाही एक भाग आहे. विजेच्या दरात मिळणारी सवलत आदी काही कारणांमुळे जीनिंग सुरू न होण्यामागची काही कारणे आहेत.

– ओंकार खुर्पे, जीनिंग व्यावसायिक

First Published on November 10, 2019 1:13 am

Web Title: ginning business got stuck in the fall rains abn 97
Just Now!
X