News Flash

पाणी पहाऱ्यात..

मराठवाडय़ातील पाणीसाठा आता जवळपास संपला असून, आता सर्व भिस्त टॅंकरवर अवलंबून आहे.

भीषण पाणीटंचाईमुळे अनेक भागात हाणामाऱ्या, नाजूक स्थिती

मराठवाडय़ातील दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी ठिकठिकाणी हाणामाऱ्या होऊ लागल्या आहेत. पाण्याच्या भीषण टंचाईमुळे अनेक भागात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत असल्याने पोलिसांनी अखेर जलकुंभांना संरक्षण दिले आहे. हाणामारी टाळण्यासाठी पोलिसांनी लातूरमध्ये जमावबंदी लागू केली होती. त्यानंतर आता परभणीत पाण्याला संरक्षण देण्याची वेळ आली आहे. नागरिकांनीही पाणी चोरी होऊ नये म्हणून घरातील टाक्यांना कुलपे ठोकली आहे.

मराठवाडय़ातील पाणीसाठा आता जवळपास संपला असून, आता सर्व भिस्त टॅंकरवर अवलंबून आहे. त्यामुळे पाण्याच्या टॅंकरवरून तसेच पाणी वितरणाच्या वेळी अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत आहे. परभणीमध्ये रविवारी जोरदार हाणामारी झाली. त्या पाश्र्वभूमीवर परभणी शहरातील दोन पाण्याच्या टाक्यांना संरक्षण देण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी टाक्यांच्या भोवताली जमावबंदी लागू केली. पाण्यावरून आतापर्यंत लातूर शहरात आठ ठिकाणी हाणामारी झाली आहे. त्यानंतर तिथे लागू केलेली जमावबंदी १ एप्रिलला संपली. दरम्यान, हाणामाऱ्या झालेल्या भागात पोलिसांनी वॉर्ड बठका घेऊन लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परभणीमध्ये सध्या स्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. पाण्यावरून संवेदनशील स्थिती बनली असली, तरी कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचा दावा परभणीच्या पोलीस अधीक्षक नियती ठकार व लातूरचे अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केला. यंदा पाणीटंचाई अधिक असली तरी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी स्थिती नसल्याचे ठकार यांनी सांगितले.

कैदीही अन्यत्र हलविणार

  • लातूर व बीड येथील कारागृहांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही कैद्यांना नाशिक व धुळे येथील कारागृहांत हलविण्याची चाचपणी कारागृह प्रशासनाने केली.
  • लातूर व बीड जिल्ह्य़ात सुमारे ३५० कैदी आहेत. कारागृहात पाणी कमी पडत होते. मात्र, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तूर्त ३ टँकर उपलब्ध केले आहेत.
  • परिस्थिती हाताबाहेर गेल्यास १०० कैद्यांना धुळे व तेवढय़ांनाच नाशिक कारागृहात हलविण्याची तयारी सुरू आहे, असे औरंगाबाद विभागाचे कारागृह महानिरीक्षक राजेंद्र धाम्हणे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 4:51 am

Web Title: giving police protection to water
Next Stories
1 ‘मुंबईत दोन्ही पक्षांना क्षमतेची चाचपणी करण्याचा अधिकार’
2 शिवस्मारक कार्यालयाचे सोमवारी मुंबईत उद्घाटन
3 ‘शेतकऱ्यांनो, उद्याच्या पिढीसाठी, सुंदर जगाच्या निर्मितीसाठी जगा’
Just Now!
X