राज्यात सरकारने दिलेली कर्जमाफी ही एक फसवणूक आहे. शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम देण्याची केलेली घोषणा देखील खोटी आहे. उत्पन्न खर्च कमी दाखवयाचा आणि नंतर किंमत ठरवायची असा सरकारचा डाव असून परिस्थिती अवाक्याबाहेर गेल्यावर पाऊल उचलायचे ही सरकारची नीती आहे. राज्यातली शेती अस्वस्थ झाली, उद्ध्वस्त झाली, त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत, एकूणच सरकारच्या घोषणा या लाबाडाच्या घरचं अवताण आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रेची सांगता सभा सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी देखील या सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तीन तलाकचा कायदा करण्याचा विचार असेल. तर मुस्लिम समाजातील धर्मगुरूंना विश्वासात घेऊन बदल करायला हवा. तलाक हा कुराणच्या माध्यमातून इस्लाम धर्मात दिलेला संदेश आहे. एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील असा हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याची राज्यकर्त्यांना नाही. त्यामुळे समाजातील लोकांना विश्वासात घेऊन बदल करायला हवा. मात्र, धर्माला विश्वासात न घेता तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असाल आणि एका धर्माच्या लोकांना वेगळ्या ठिकाणी पोचवत आसाल. तर आम्ही पाठिंबा देणार नाही, असे मत पवार यांनी औरंगाबाद येथे झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप प्रसंगी केले.

सरकारविषयी लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. १६ हजार लोकांनी आत्महत्या केल्या. कोणाला दोष द्यावा, मुलाबाळांचा विचार न करता माणूस आत्महत्याच्या मार्गाला जातो. त्याच्या अवाक्याबाहेर परस्थिती गेल्यावर हे पाऊल उचलले जात आहे. शेती उध्वस्त झाली आहे, त्यामुळे हे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी ही एक फसवणूक असून आघाडी सरकारच्या काळात ८६ हजार कोटींचा कर्जपुरवठा ९ लाख कोटींपर्यंत पोहचवला. गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने यात २ लाखांची वाढ केली आहे. म्हणजे आता कर्ज सुद्धा देत नाहीत. सरकार काय देतंय तर, बेरोजगारी, धार्मिक दंगली, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

धार्मिक विषयात सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. होत असेल तर आम्ही त्याला विरोध करू. शरद पवार यांनी सगळ्यांचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांनी व्यक्त केली. त्यावर समाजाचे मत लक्षात घ्यावे. ट्रिपल तलाक बंद केला आहे. मात्र, पुरुषांना तीन वर्षाची शिक्षा याला आमचा विरोध असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. महिलांना न्याय द्यायचा असेल तर पन्नास टक्के आरक्षण द्या. शरद पवार यांचा आदर्श घेऊन चाला असे सुळे म्हणाल्या.