शिवकालीन गड-किल्ल्यांना जगाच्या पटलावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी शिवकालीन गड-किल्ल्यांना जागतिक वारसा मिळवून देण्यासाठी युनेस्कोकडे (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अ‍ॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन) शिफारस करण्यात आलेली आहे. भारत सरकारकडेही या अनुषंगनाने प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मराठवाडय़ात २० किल्ले आहेत. त्यातील ७५ टक्के किल्ले हे राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे आहेत. या किल्ल्यांची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळही अपुरे पडत आहे. परिणामी देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांची पडझड होत असल्याकडे दुर्लक्ष होत आहे. औरंगाबाद जवळील वेरुळ येथीलही मालोजी राजे भोसले यांची गढी म्हणून ओळख असलेल्या ठिकाणीही आता केवळ अवशेषच शिल्लक आहेत. मालोजी राजे भोसले हे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा. त्यांच्याच नावाने ओळखली जात असलेल्या गढीच्या ठिकाणी सध्या मातीचे ढिगारे आहेत. याच ठिकाणी शहाजी राजे यांचाही एक पुतळा आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेला हा पुतळा असला तरी मालोजी राजे गढीचे जतन होण्याच्या दिशेने दुर्लक्षच होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मालोजी राजे यांच्या गढीची पाहणी केली. यावेळी त्यांनी गड-किल्ल्यांचा वारसा जागतिक स्तरावर नेण्याच्या दिशेने राज्य सरकार पाऊले टाकत असल्याची माहिती दिली.

राज्य सरकारच्या अखत्यारितील गड-किल्ल्यांची देखभाल व संवर्धन व्हावे यासाठी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनाच प्राधिकृत करण्याचा विचार सुरू आहे. शिवकालीन गड-किल्ले आणि शिवरायांनी गनिमी काव्याचा अवलंब करून मिळवलेला विजय हा युद्धनीतीचा एक अभूतपूर्व नमुना असून या युद्धतंत्राची ओळख जागतिक स्तरावर व्हावी, यासाठी युनेस्कोकडे शिफारस करण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर इतिहास तज्ज्ञ, पुरातत्त्व विषयाचे तज्ज्ञ यांच्या विचाराने एक विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या आराखडय़ाला मंजुरी देण्यात येईल. मालोजी राजे गढी ही एक प्रकारे स्वराज्याचे मूळ मानले जाते.

* मराठवाडय़ात २० किल्ले आहेत. त्यातील ७५ टक्के किल्ले हे राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे आहेत.

* या किल्ल्यांची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळही अपुरे पडत आहे. परिणामी देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांची पडझड होत असल्याकडे दुर्लक्ष होत आहे.

* औरंगाबादजवळील वेरुळ येथीलही मालोजी राजे भोसले यांची गढी म्हणून ओळख असलेल्या ठिकाणीही आता केवळ अवशेषच शिल्लक आहेत.

मालोजी राजे..

मालोजी राजे यांचे वडील बाबाजी राजे भोसले हे वेरुळचे पाटील. मालोजी राजे हे शहाजी राजेंचे वडील. मालोजी राजेंची समाधी घृष्णेश्वराच्या मंदिरासमोर आहे. वेरुळ जवळच्या गढीला मालोजी राजेंच्या नावाने ओळखले जाते. औरंगाबादेत मालोजी पुरा नावाचा एक भागही मुख्य बसस्थानक परिसरात आहे. येथे त्यांची छावणी होती. मालोजी राजेंना दोन मुले. शहाजी राजे आणि शरीफजी. या दोघांनी निजामाच्याकाळात चांगली कामगिरी केली होती. म्हणून मलिक अंबरने दोघांनाही सोबत घेतले. एका लढाईत शरीफजी कामी आले. शहाजी राजेंच्या कामगिरीचा विस्तार होत राहिला.

शिवकालीन गड-किल्ले याबद्दल महाविकास आघाडी सरकार गंभीर आहे. प्राचीन मंदिरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठीही भरीव निधी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. मागच्या काळातही येथे जो विकास झाला तो महाराष्ट्र शासनाच्याच पुढाकाराने झाला आहे.

– अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री