05 April 2020

News Flash

करोनाच्या नियंत्रणासाठी ‘घाटी’तील आरोग्ययंत्रणा तकलादू

करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनाही पुरवण्यात येणारी साधनसामग्री अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही

(संग्रहित छायाचित्र)

नातेवाइकांची गर्दी रोखण्याचे आव्हान; नवोदित डॉक्टरांच्या मदतीने ‘उपचार’

औरंगाबाद : औरंगाबादचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) हे रुग्णांवरील उपचाराचे प्रमुख केंद्र. मराठवाडा, विदर्भातील बुलडाणा, खान्देशसह अहमदनगरमधूनही येथे रुग्ण दाखल होतात. रुग्ण आणि रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्या पाहता सुमारे पाच हजार जणांचा राबता घाटी परिसरात दररोज पाहायला मिळतो.

या गर्दीकडे करोना विषाणू संक्रमणाचा फैलाव होऊन तो रोखण्याच्या दृष्टीने आणि प्रत्यक्ष करोनाची लागण झाल्यानंतर उपचाराच्या साधनसुविधा उपलब्ध करून देण्याच्या पार्श्वभूमीवर पाहिले असता घाटीतील यंत्रणा तकलादू असल्याचेच दिसत आहे. शिवाय घाटीतील कामकाजाचा भार सध्या केवळ आठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर चालवण्यात येत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनाही पुरवण्यात येणारी साधनसामग्री अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अनुभवी, प्रशिक्षित डॉक्टर, परिचारक-परिचारिका, प्रयोगशाळा, तपासणी यंत्राच्या कक्षातील तंत्रज्ञांनाही मास्क, तपासणीनंतर वारंवार हात धुण्यासाठीचे रसायनही (सॅनिटायझर) अनेक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. अनेक डॉक्टरांनी स्वखर्चातून मास्क खरेदी केला आहे. तर घाटीत दाखल झालेल्या करोनाच्या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणाऱ्या तंत्रज्ञांनाही गुरुवापर्यंत मास्क देण्यात आलेला नव्हता.

औरंगाबादेत घाटीसह शासकीय कर्करुग्ण रुग्णालयही असल्यामुळे वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण येथे दाखल होत असतात.

घाटीमध्ये दररोज १ हजार ८०० ते १ हजार ९०० पर्यंत बाह्य़रुग्ण तपासणी होते. याशिवाय आंतररुग्ण विभागातही तेवढीच संख्या किंवा त्यापेक्षा अधिकची संख्या असते. घाटीमध्ये साधारण १ हजार १७७ खाटा असून रुग्णांची संख्या त्यापेक्षा जवळपास दुप्पटच्या संख्येने असते. या सर्व तपासणीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक डॉक्टरांचा चमूही घाटीकडे नाही. वीस निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना घाटीमध्ये कार्यरत केवळ आठच जण आहेत. त्यातही एखाद्या डॉक्टरावर वैयक्तिक पातळीवर सुटी घ्यायची वेळ आली तर पुन्हा संख्या रिक्त राहते. नवोदित डॉक्टरांच्या मदतीने उपचाराचा ‘उपचार’ केला जात असला तरी त्यातून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे समाधान न झाल्याच्या पार्श्वभूमीवर वाद आणि डॉक्टरांना मारहाण झाल्याच्याही अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

घाटीत कायमच रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करून आणण्याचे सांगितले जाते. एमआरआयचीही सोय सध्या नाही. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधीक्षक सुरेश हडबडे यांनी सांगितले की, घाटीला १ हजार १०० खाटांवरील रुग्णांच्या तुलनेत औषधींचा पुरवठा होतो. यासंदर्भाने विधानसभेत आणि खंडपीठातही प्रश्न मांडण्यात आलेला आहे. ग्रामीण आणि शहरातीलही रुग्ण घाटीतच येऊन उपचार करण्याला प्राधान्य देतात. हाफकिनकडून औषधांचा पुरवठा होतो.

एमआरआयबाबत त्याच्या काही तांत्रिक बाबी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. संबंधित कंपनीने ३१ मार्चपर्यंत एमआयआरच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यानुसार झाले तर १ एप्रिलपासून एमआरआयची सुविधा उपलब्ध होईल.

संशयित रुग्णावर उपचार

घाटीत दाखल करण्यात आलेल्या १६ वर्षीय युवकावर सध्या हृदयरुग्ण विभागात तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षात उपचार सुरू आहेत. घाटीतील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते संशयित रुग्णामध्ये न्युमोनियासारखी लक्षणे आढळून आली असून खबरदारी म्हणून त्याच्या थुंकीचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर रक्तासह इतर काही तपासण्या या घाटीतीलच प्रयोगशाळेत करण्यात येत आहेत, असे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

गर्दी रोखण्यासाठी पास उपलब्ध

घाटीत रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी गर्दी पाहता पासची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र बऱ्याचवेळा दोनपेक्षा जास्त नातेवाइकांना पास उपलब्ध करून देण्यात आला नाही,तर वाद उकरून काढला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्डसाठी २५ मास्क देण्यात आलेले आहेत. एन-९५ हा मास्क मात्र प्रत्येकाला देणे शक्य नाही. कारण हा मास्क आठ तासांपर्यंतच चालतो. त्यामुळे करोना कक्षात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच तो देण्यात आलेला आहे.

– सुरेश हडबडे, वैद्यकीय अधीक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 2:48 am

Web Title: government medical college and hospital aurangabad for caronavirus patients zws 70
Next Stories
1 मराठवाडय़ात ‘माधवं’ विस्तारण्यासाठीच भाजपतर्फे डॉ. कराड यांना राज्यसभा उमेदवारी
2 तिथीनुसार शिवजयंतीसाठी राज ठाकरे औरंगाबादेत
3 औरंगाबादमधून आदित्य देशमुख महाअंतिम फेरीत
Just Now!
X