News Flash

बीडच्या अपर जिल्हाधिकाऱ्यास पाच लाखांची लाच घेताना अटक

बीड येथील पुरवठा विभाग नेहमीच चर्चेत असतो.

अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे (मध्यभागी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणताना पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील व सहकारी.

स्वस्त धान्याच्या अनियमिततेप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमध्ये तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्यासह अव्वल कारकून महादेव महाकुडे यास शनिवारी पकडण्यात आले. कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानीच ही कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी घराची झडती घेतली. दोघांनाही अटक करण्यात आली असून बीडसह औरंगाबाद, नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांनी दिली.

बीड येथे शनिवारी अपर जिल्हाधिकारी बाबुराव मरीबा कांबळे(वय ५६) आणि तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन महादेव चांगुजी महाकुडे(वय ५५) या दोघांना तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. नगर रस्त्यावरील कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. तक्रारदार हा सन २०१४-१५ मध्ये गोदाम निरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्या वेळी स्वस्त धान्य वाटपाच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्या प्रकरणी त्याच्याविरुध्द कारवाई करुन चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. ही चौकशी अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्याकडे होती. या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने चौकशीचा अहवाल देण्यासाठी कांबळे यांनी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने ३१ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शनिवारी पोलिस उपाधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावून दोघांना तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना पकडले. दोघांनाही अटक करण्यात आली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईची माहिती कळताच औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी तातडीने बीडमध्ये दाखल झाले होते. राज्यात अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. महादेव महाकुडे याच्या बीड तालुक्यातील तळेगाव येथील घराचीही तपासणी करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांनी पत्रकार बठकीत सांगितले.

बीड येथील पुरवठा विभाग नेहमीच चर्चेत असतो. वर्षभरापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.नरहरी शेळके व प्रतिनियुक्तीवरील लेखा पर्यवेक्षक बब्रुवान फड यांना एक लाख १५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. स्वस्त धान्य वितरणाची जबाबदारी असलेल्या या विभागात नेहमीच आíथक व्यवहार होत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या होत्या. महाकुडे याच्यासह अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना पकडल्याने पुरवठय़ासह महसूल विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड चव्हाटय़ावर आली असून प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 12:11 am

Web Title: government officer arrested for accepting a bribe
Next Stories
1 उद्योजकासह पत्नी, नातवावर प्राणघातक हल्ला
2 हेल्मेट असेल तरच दुचाकी होणार सुरु; औरंगाबादच्या विद्यार्थ्याची स्मार्ट निर्मिती
3 औरंगाबादेत मध्यरात्री थरार, चोराचा घरात घुसून कुटुंबियांवर हल्ला
Just Now!
X