औरंगाबाद : माता, मातृभाषा आणि मातृभूमी याकडे लक्ष दिले तर विकासाचा वेग वाढू शकतो, हे चीनच्या विकासावरून सिद्ध झाले आहे. आपणही आपली मातृभाषा, माता आणि मातृभूमीकडे लक्ष देऊन मार्गक्रमण केले तर पुढे जाता येईल, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, अश्विनी कुमार नांगिया यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख व विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

इंग्रजी भाषेतून दिले जाणारे शिक्षण अलीकडच्या काळातील आहे. एका शिक्षणतज्ज्ञाने अलीकडेच एक पुस्तक लिहिले. त्यात मातृभाषेतून शिक्षण दिले तर उन्नतीकडे जाण्याचा प्रवास वेगाने होतो असे म्हटले आहे. चीन हे त्याचे उदाहरण आहे. कारण त्यांनी त्यांची भाषा व लिपी सोडली नाही. आम्ही शिक्षण घेत असताना देव न मानणारे कम्युनिस्ट कार्यकर्ते आम्हाला नावे ठेवत. पण परीक्षेच्या दिवशी हमखास हनुमानाचे दर्शन घ्यायला जायचे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी ध्येय अधिक मोठे असावे लागते. त्यासाठी काम करण्याची तयारीही लागते. पण आपल्याकडे शिक्षण देतानाच पालकदेखील असा विचार करत नाही. एकदा एका मित्राला विचारले होते, मुलाला काय बनवशील. तो झटकन इंजिनिअर असे म्हणाला. कारण इंजिनिअरला हाताखाली शिपाई मिळतो, बसायला गाडी मिळते. नोकरीशिवाय वरकमाईदेखील असते. पण तो आपल्या मुलाला प्राध्यापक बनविण्यास इच्छुक नसतो. कारण आपल्याकडे ध्येय उदात्त ठेवण्याची पद्धत नाही, असे सांगत कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ७० वर्षांत स्वच्छतागृह बांधू असे म्हणणारा पंतप्रधान झाला नव्हता. असे कसे घडले असेल? ७० वर्षे आपण विचारच कसा केला नसेल? छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून अधिक मोठे घडत असते. शौचालयाबरोबरच घरोघरी गॅस दिला, वीजही दिली. असा विचार करायला योग्य दिशा लागते. मला पंतप्रधान म्हणून कोणाचे कौतुक करायचे नाही. पण विचार योग्य दिशेला हवे असे म्हणत कोश्यारी यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले.

१८ ते २० तास देशाचा पंतप्रधान काम करतो, मग राज्यपालाने १६-१७ तास काम केले तर काय हरकत आहे, असा प्रश्न विचारत सध्या ते किती काम करत आहेत, याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. पाच हजार वर्षांचा इतिहास असणाऱ्या देशाने आणि त्यातील विद्यार्थ्यांनी मातृभाषा आणि मातृभूमी याकडे लक्ष दिले तर आपण मागे राहणार नाही, असे कोश्यारी म्हणाले.