हागणदारीमुक्त गाव मोहिमेतील कामचुकारपणा गंगापूर तालुक्यातील ग्रामसेवकांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.

ज्या गावात हागणदारीमुक्त गाव या मोहिमेअंतर्गत शौचालय बांधकामाच काम दहा ते तीस टक्क्यांपेक्षा कमी झालं आहे, अशा ग्रामसेवकांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये गंगापूर तालुक्यातील एम. एफ. शेख,(अंबंलोहळ ), ए. एस. शेंगुळ, (हैबतपुर), एस सी धनुरे (जिकठान), गाडेकर (मांगेगाव ) या चार ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. तर एम एस डोळसे(कनकोरी), एस एस हाके(कोडापुर), रावते मालुंजा खुर्द जी एस कदम (शहापूर) या चार ग्रामसेवकांचा समावेश आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चालवलेल्या मोहिमेत वारंवार आदेश देऊनही काम चुकारपणा केल्याचा या ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

स्वच्छ भारत अभियान हे केंद्र आणि राज्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून या उपक्रमाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्या हगाणदारी मुक्त करण्याचा निश्चय केला आहे. राज्याचा हा संकल्पानंतर औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वच्छता मोहीमेचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठीच्या कामकाजाचा आढावा वेळोवळी घेतला जात असून सोमवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये ४ ग्रामसेवक आणि ४ ग्रामविकास अधिकारी जाणीवपूर्वक कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीच्या तीन आढावा बैठकीत त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, कोणतीही सुधारणा दिसली नसल्यामुळे त्यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.