माणसा माणसातील दुरावा वेगाने वाढणाऱ्या जमान्यात दररोज आठ ते दहा माणसांना घरी जाऊन भेटणारा व त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय प्रसंगात रममाण होत सुंदर हस्ताक्षरातील शुभेच्छापत्र देणारे दिलीप डागा हे लातूरकरांसाठी अक्षरयात्री ठरत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ४ लाख जणांना शुभेच्छापत्रे दिली आहेत.
भेटणाऱ्या माणसाचे नाव, पत्ता, जन्मतारीख, लग्नाचा वाढदिवस लिहून ठेवायची सवय असणाऱ्या डागा यांनी किमान १० जणांना तरी शुभेच्छापत्र देतात. त्यांच्या या छंदासाठी त्यांनी बरेच प्रयत्न जाणीवपूर्व जोपासले. स्वतंत्र डायऱ्यांमध्ये दररोज रात्री घरी गेल्यानंतर भेटलेल्या व्यक्तीची सर्व माहिती नोंदवतात. शुभदिनाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीला हाताने तयार केलेली. शुभेच्छापत्र, त्यावर रंगीबेरंगी चित्रे, कधी संग्रहातील चित्रे, सुविचार डकवून प्रत्येक शुभेच्छापत्र वेगळे राहील, अशी काळजी ते घेतात.
दिलीप डागा हे मूळचे सोलापूरचे. अडीच वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त लातुरात आले. आठवी, नववीत दमानी हायस्कूल सोलापूरमध्ये शिकत असताना सर्वात खराब अक्षर असणारा विद्यार्थी म्हणून दिलीपची ओळख होती. त्या काळी तीनचार मित्रांना शाळेतील खांडेकर गुरुजी घरी येऊन शिकवत असत. दिलीपचे अक्षर खराब असल्यामुळे त्यांनी कसल्याही परिस्थितीत तुझे अक्षर सुधारले पाहिजे, असे सांगितले आणि अगदी ठाकूनठोकून दररोज लिहिण्याचा सराव करत वर्षभरात वर्गातील सर्वात उत्कृष्ट अक्षर असलेला विद्यार्थी म्हणून दिलीपची ओळख झाली.
वडिलांचा व्यवसाय. त्यामुळे दिलीपला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखीपाळखीच्या मंडळींना वाढदिवस, लग्न, लग्नाचा वाढदिवस अशा निमित्ताने ते शुभेच्छापत्र पाठवण्याचा आग्रह धरू लागले. त्यातून छंद जडत गेला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही अक्षरांच्या स्पध्रेत दिलीपने विद्यापीठ स्तरावरील व विविध सामाजिक संस्थांची पंचेवीसएक बक्षिसे मिळविली. हे करत असतानाच वाचनाची आवड निर्माण झाली. व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, प्रवीण दवणे अशा विविध साहित्यिकांच्या पुस्तकाची माया जडली. त्यातून शुभेच्छापत्रात नवनवी वाक्य लिहिण्यास सुरुवात झाली व तो छंद विकसित होत गेला. विविध कारणांनी आतापर्यंत सुमारे ४ लाख लोकांना अशी स्वेच्छा शुभेच्छापत्रे दिलीप डागा यांनी पाठवली आहेत.
गेल्या अडीच वर्षांत लातुरातील किमान ६ हजार जणांच्या ते प्रत्यक्ष घरी जाऊन आले आहेत. दुकान उघडण्यापूर्वी व दुकान बंद झाल्यानंतर शुभेच्छापत्र देण्यासाठी ते स्वत: घरी जातात. ही कामे ते नोकरांमार्फत करत नाहीत. ९० टक्के मंडळी पुन्हा त्यांची आठवणही ठेवत नाहीत. मात्र, समोरच्याकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता ते हा छंद जोपासतात. १० टक्के मंडळी मात्र दिलीप डागाच्या या अभिनव छंदाचे मनापासून कौतुक करतात. गेल्या सहा वर्षांपासून शब्दगंध नावाने कॉपी रायटिंगचा व्यवसायही ते करतात. तो उत्तम चालतो. मात्र, या व्यवसायाचा व आपल्या छंदाची ते जोड कधी घालत नाहीत. व्यवसायाची जाहिरात करत नाहीत. विविध सणांच्या निमित्ताने त्यांची कलात्मक व देखणी शुभेच्छापत्रे संस्मरणीय ठरली आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून लातुरात ते दुलारी नावाने डिस्पोजेबल प्लास्टिकच्या वस्तूंच्या विक्रीचे दुकान चालवतात. मात्र, त्यांची शुभेच्छापत्रे ही घरोघरी वर्षांनुवष्रे सांभाळून ठेवली जातात.
आयुष्य हे आनंद घेण्यासाठी आहे. या छंदामुळे आपल्या मनाची ऊर्जा वाढते, निराशा कमी होते, रोज नव्या माणसांना भेटण्याचा आनंद मिळतो, असे ते सांगतात. आपला हा छंद वाढावा यासाठी आपले वडील राजगोपालजी हे आपल्याला सतत प्रोत्साहित करत असतात. दररोज वर्तमानपत्र वाचून कुठल्या नव्या माणसाला मी भेटले पाहिजे हे ते सांगतात व त्यासाठीचा पाठपुरावा करतात. संध्याकाळी कोणाला भेटायला निघाल्यानंतर पत्नी श्रद्धा सोबत येते. शुभेच्छापत्र तयार करण्यासाठी मुलगी नेहा व भाची दुलारी या दोघी मदत करतात. माणसातील ओलावा कमी होत चालला आहे. जवळच्या नातेवाइकांनाही कोणी बोलायला तयार नाही. प्रेम, जिव्हाळा आटत चालल्याची खंत व्यक्त करणारी मंडळी सभोवताली प्रचंड सापडतात. अशा रुक्ष वातावरणात इतरांच्या आयुष्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम दिलीप डागा करतात. हा अवलिया अनेकांना प्रेरणा देणारा आहे.