औरंगाबाद येथील ग्राईंड मास्टर कंपनीकडून निर्मिती

औरंगाबाद : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्याने सर्वत्र व्हेंटिलेटरची मागणी वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागात हे यंत्र उपलब्ध होणे तसे अवघड आहे. त्यामुळे श्वसनाला सहाय्य करेल, असे यंत्र औरंगाबाद येथील ग्राईंड मास्टर या उद्योगाचे प्रमुख समीर केळकर यांनी तयार केले आहे. या यंत्रास ‘प्राण’ असे नाव देण्यात आले आहे.

सर्वसाधारणपणे श्वसनाचे विकार तपासताना फुफ्फुसाची शक्ती मोजण्यासाठी विशिष्ट प्रकारचा फुगा (अ‍ॅम्बू बॅग) वापरून हे यंत्र विकसित करण्यात आले आहे. ५२० मिलीच्या अ‍ॅम्बू बॅगच्या आधारे प्रतिमिनिट १२ ते २० पूर्ण श्वास मिळू शकतात, असे हे यंत्र आहे. या यंत्रास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिली तर अधिकचे उत्पादन करता येईल, असे उद्योजक समीर केळकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

श्वसन सहाय्य यंत्र विकसित करण्याचे कारण प्रत्येक गावात व्हेंटिलेटरची सोय पोहोचू शकत नाही. तसे झाले तर अधिक चांगलेच. पण श्वसनाला सहाय्य करेल असे मशीन तयार करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे अम्बू बॅग श्वसनविकार रुग्णांमध्ये वापरले जाते. मात्र, त्याची हाताळणी हाताने केली जाते. त्या बॅगचा उपयोग करून श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग होतो. बाजारात मुलांसाठी आणि मोठय़ा व्यक्तींसाठी अशा अ‍ॅम्बू बॅग मिळतात.

पण मोठी बॅग वापरून श्वासाच्या गतीवर नियंत्रण  मिळविता येईल, अशा पद्धतीने यंत्र बनविले आहे. त्यात अ‍ॅम्बू बॅग बरोबर सर्वोमोटरही वापरण्यात आली आहे. ग्रामीण भागात विजेच्या सहाय्याने हे यंत्र हाताळणे शक्य आहे. या यंत्राचे ‘प्रोटोटाईप’यंत्र  बनविण्यात आले आहे. यापूर्वीही समीर केळकर यांनी रोबोटिकमधील संशोधानामध्ये मोठे काम केले आहे. अगदी शिल्पकलाही रोबोच्या मदतीने करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने श्वसन सहाय्य करणारे यंत्र ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावर अधिक उपयोगी पडू शकेल, असा उद्योजक केळकर यांचा दावा आहे. जर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिली तर या यंत्राचे उत्पादन वाढविता येईल, असेही केळकर यांनी म्हटले आहे.