12 December 2017

News Flash

कचऱ्यातील मातीमोल जगण्याला वस्तू व सेवा कराचे ‘ग्रहण’

वस्तू व सेवा कराचा सर्वात वेगात परिणाम झालेला घटक कोणता?

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद | Updated: August 6, 2017 12:47 AM

वस्तू व सेवा कराचा सर्वात वेगात परिणाम झालेला घटक कोणता?- कचरावेचक! कचऱ्यातील कागद, प्लास्टिक, काच, पुठ्ठे अशा पुनर्वापराच्या बाबींवर १२-१८ टक्के कर लागला आणि शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीमधील साठीतल्या कडूबाई भीमराव बनकर यांचे अर्थकारण आक्रसले. कचरा वेचून त्याचे विलगीकरण करणाऱ्या कडूबाईंना भंगारवाल्यांनी सांगितले, ‘यापुढे काच, बुटाचे तळवे विकत घेणार नाही. कचऱ्यातील प्लास्टिकचा दर किलोमागे रुपयाने कमी दिला जाईल.’ तेव्हा कडूबाईचा नाईलाज होता. त्यांना माहीतही नव्हते, भंगाराचे दर का उतरले. वस्तू व सेवा कराचा फटका बसणाऱ्यांमध्ये औरंगाबाद शहरातील सुमारे दीड हजार कामगार आहेत. कडूबाई त्यातील एक. वस्तू सेवा कराची अजून नोंदणीही पूर्ण झालेली नाही तरी कचरा साफ करुन पोट भरणाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसू लागला आहे.

सकाळच्या सुमारास महापालिकेने सेंट्रल नाक्याजवळील केंद्रात कचरा आणून टाकला की त्याचे विलगीकरण करणाऱ्यांमध्ये जशा कडूबाई तशाच यशोदाबाई. तीस वर्षांपासून कचरावेचक म्हणून त्या काम करतात. त्या सांगत होत्या, ‘पूर्वी बिअरची एक बाटली विकली की दोन रुपये मिळायचे. आता दोन रुपये किलोने बाटली विकली जाते. पूर्वीचा भाव उतरला आहे. संसारातील नाना अडचणी कधी सुटल्यात? पण मागच्या दोन महिन्यात जास्तच हैराण झाले.’ केवळ कचरा वेचक हैराण झाले असे नाही. विलग झालेला कचरा खरेदी करणारे हिना नगरमधील व्यापारी शादाब सिद्दीकी सांगत होते, ‘तसा मी दर महिन्याला सात ते साडेसात लाख रुपयांची कचरा खरेदी-विक्रीची उलाढाल करतो. आता ती अडीच लाखांवर आली आहे. कारण कंपन्यांना लागणाऱ्या जीएसटीमध्ये वाढ झाली आहे. तो कर सहन कोणी करायचा याविषयी संभ्रम आहे. सगळी बाजारपेठ जवळपास ठप्प आहे. काच तर कोणीच विकत घेत नाही. बुटांच्या तळव्यांनी गोदामे भरली आहेत. त्यामुळे आम्ही माल विकत घेऊ शकत नाही. परिणाम कचरावेचकांवर होणारच.’ औरंगाबाद शहरात कचरा विकत घेणारे २१० व्यापारी आहेत. अशी स्थिती फक्त औरंगाबाद शहरात आहे असे नाही. राज्यभर भंगार व्यावसायिकांनी त्यांचे दर कमी केल्यामुळे कचरा वेचणारा ‘तळातील माणूस अधिक गाळात’ सापडला जात आहे.

कचरा वेचकांमध्ये काम करणाऱ्या ‘सिव्हीक’ या सामाजिक संस्थेच्या नताशा झरीन म्हणाल्या, ‘सर्वसाधारणपणे चाळिशीच्या पुढील वयाच्या महिला या क्षेत्रात अधिक संख्येने आहेत. पायात गम बुट नसणे, हातमोजे नसणे, या समस्या सर्वत्र आहेत. औरंगाबादपुरता थोडासा चांगला प्रयोग आम्ही केला. मात्र, वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीच्या घोषणेनंतर या महिलांचे प्रश्न अधिक बिकट होऊ लागले. प्रत्येक घरात सहा माणसे आहेत. २०-२२ वर्षांपासून ही माणसे कचऱ्यातच आयुष्य घालवत आहेत, त्यांची सरासरी मजुरी साधारण ३४० रुपयांपर्यंत होती. आता ती बरीच घटली आहे.’

कचऱ्यातील पुनर्वापराचे घटक विकत घेणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ हे घोषवाक्य अधिक व्यापक असल्याचे सांगितले जाते. कचऱ्यातील भावांची चढ-उतार जीएसटी लागू झाल्यानंतर वाढली आहे. त्याचा थेट परिणाम ‘भंगार’ धंद्यातील व्यक्तींवर होत आहे.

First Published on August 6, 2017 12:47 am

Web Title: gst affected on garbage picker workers life