News Flash

गुटखा वाईटच, पण तंबाखू अन्नपदार्थ कसा?

 गुन्हा नोंदणीत बदल करण्यासाठी डॉ. शिंगणे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

गेल्या महिन्याभरात राज्यात ९३ लाख २४ हजार रुपयांचा गुटखा पकडून दाखल झालेल्या २४९ गुन्ह््यांमध्ये ३८५ जणांना अटक झाली आणि दोन प्रकरणे वगळता राज्यात सर्व आरोपींना जामीन मिळाला.

गृह मंत्रालयाकडून अशा प्रकरणात ना तपास पुढे सरकतो ना आरोपींना जामीन मिळू नये असे प्रयत्न होतात. उलट कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी गुन्हेगार जामिनावर बाहेर पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर गृहमंत्र्यांशीही याबाबत चर्चा झाली आहे. या प्रकरणात जामीन मिळू नये असे कलम लावू नका असे पोलीस अधिकाऱ्यांनी लिहिलेले पत्र मागे घ्यावी, अशी विनंती गृह मंत्रालयाला केली असल्याचे अन्न व औषधे विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘ लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

२०१६ पासून दरवर्षी राज्यात गुटखाबंदी होत असली तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. गुटखाविरोधी कारवाईचा भाग सुरू असतानाच यात अनेक अंतर्विरोध असल्याचे या विभागाचे मंत्री मान्य करतात. गुटखा वाईट आहेच, पण केंद्र सरकारने अन्नपदार्थाच्या यादीत तंबाखूला स्थान दिले आहे. तंबाखू हा अन्नपदार्थ कसा असेल, असा प्रश्न त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केला.

राज्यात अन्न व औषध प्रशासनाने गुटखा माफियांच्या विरोधात मोहीम उघडली असून गेल्या काही दिवसांत ९३ लाख रुपयांपेक्षा अधिकचा गुटखा पकडला. ३८५ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर कलम ३२८ अन्वये गुन्हे दाखल करणे अपेक्षित असताना पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून गुटखा माफियांना पाठबळ देण्याचे प्रकार सुरू आहेत. राज्याच्या पोलीस अपर महासंचालकांनी काढलेल्या पत्रात दुरुस्ती करावी, अशी मागणी अन्न व औषध मंत्री शिंगणे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना जामीन मिळू नये अशी कलमे लावा असे दूरध्वनीही डॉ. शिंगणे यांनी पोलीस ठाण्यापर्यंत केले. एखादा अपवाद वगळता आरोपी सुटून जावेत असेच प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला गुटख्यावर कारवाई सुरू असताना तंबाखू हा अन्नपदार्थ कसा, असा प्रश्नही शिंगणे यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या जवळ असणाऱ्या टपऱ्यांमध्ये होणारी गुटखा विक्री थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. राज्यात ३८० हून अधिक विक्री केंद्रे म्हणजे टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

गुटखा आणि त्याची सवय वाईटच. दरवर्षी राज्य सरकारकडून गुटखाबंदी जाहीर केली जाते. पण तंबाखू मात्र अन्नपदार्थ आहे. त्याच्या विक्रीला बंदी नाही. हा विरोधाभास लक्षात घ्यायला हवा. पण तंबाखू अन्नपदार्थ कसा असेल?

– डॉ. राजेंद्र शिंगणे, मंत्री अन्न व औषधे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 12:40 am

Web Title: gutkha is bad but how about tobacco food abn 97
Next Stories
1 गुटखा माफियांवर कारवाईनंतर जामिनाला पोलीस विभागाकडून बळ!
2 पंजाबमधील हार्वेस्टरचालकांसाठी ‘सुगी’ महाराष्ट्रातील गहू काढणीमुळे  
3 औरंगाबाद शहरात लॉकडाउन; वेरुळ, अजिंठ्यासह पर्यटनस्थळे पुन्हा बंद
Just Now!
X