सुहास सरदेशमुख

तोंडात गुटख्याचा ऐवज जमा झाल्याने त्याला बोलता येत नव्हते. मग मुखपट्टी काढली. पिचकारी टाकून तोंड मोकळे केले आणि म्हणाला, ‘करोना काही कमी होत नाही.’ टाळेबंदीनंतर पानटपऱ्या सुरू झाल्या आणि गावोगावच्या गुटख्याच्या धंद्यातील व्यक्तींनी त्यांची उत्पादन-वितरणाची साखळी सुरू केली. तरी मराठवाडय़ात अन्न व औषध प्रशासनाने टाळेबंदीच्या काळात २३९ जप्ती कारवायांमध्ये पाच कोटी ३४ लाख ८५ हजार ३३९ रुपयांचा गुटखा जप्त केला. तरीही तो सर्वत्र उपलब्ध असतो. थुंकींचा थेंबही उडू नये, याची दक्षता घेण्यासाठी मुखपट्टी वापरायची असते हे माहीत असणारी सुशिक्षित मंडळी चौकाचौकांत दुचाकी आणि चारचाकीतून थुंकत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. औरंगाबाद आणि मराठवाडय़ात हे प्रमाण अधिक आहे. मुखपट्टी लावली नाही म्हणून दंड ठोठावणारी महापालिकेची यंत्रणा सार्वजनिक स्थानी थुंकल्यावर काहीच कारवाई करत नसल्याने ‘मुखपट्टी लावू अन् गावभर थुंकू’ असे चित्र दिसून येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील शिराढोण येथे एक व्यक्ती सुपारीचा बारविक्रेत्याला करोनाचा संसर्ग झाला. टाळेबंदीच्या काळात तो किमान ५०० जणांकडे जाऊन सुपारी पोहचवून आला होता. दूरध्वनीवरून त्याला घरी बोलावून घेणारेही अनेकजण होते, हे करोना संपर्क व्यक्ती शोधण्यातून पुढे आले होते. रुग्ण कोणत्या भागात फिरले आणि त्याच्या संपर्कातील व्यक्ती कोठे कोठे जाऊन आल्या, याची खातरजमा करण्यासाठी भ्रमणध्वनीची तपासणी होत. अशा तपासणीमध्ये गुटखा आणि सुपारी पोहचविणारे अनेकजण असल्याचे दिसून आले होते. यामध्ये उस्मानाबाद, लातूर आणि औरंगाबादमध्ये अधिक प्रमाण होते. करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला तसे मुखपट्टी वापराचे महत्त्व सांगण्यात आले. तोंडावाटे बाहेर पडणारे थेंब एकमेकांच्या अंगावर उडाले तर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मुखपट्टी बांधणे अनिवार्य करण्यात आले. पण मुखपट्टीचा वापर बोलतानाही करायचा हे कोणी सांगत नसल्याने कोणी समोर आले की मुखपट्टी काढून बोलायची सवय अनेकांना आहे. मुखपट्टी लावा असे सांगितल्यावर घाम आला होता म्हणून काढली असेही सांगणारे अनेकजण आहेत. एका बाजूला मुखपट्टीचा बाजार प्रत्येक चौकात असला तरी सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांचे प्रमाण पूर्वीसारखेच कायम आहे. गुटखा खाऊन थुंकायचे आणि नंतर मुखपट्टी लावायची अशी नवी पद्धत औरंगाबादसह सर्व मोठय़ा शहरांमध्ये दिसून येत आहे. करोनाकाळात वाहतुकीवर अनेक प्रकारचे निर्बंध असले तरी गुटख्याच्या व्यवसायावर त्याचा काहीएक परिणाम झाला नसल्याचे पानटपरी चालकही सांगतात.

तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांवर कोणतेही बंधन नाही आणि अन्य विक्रेत्यांच्या चाचण्यांचा आग्रह अनाकलनीय आहे. केवळ मुखपट्टी अनिवार्य करून चालणार नाही, तर थुंकणाऱ्यांना जबर दंड बसवण्यासाठी पथके स्थापन करावीत अशी मागणी करण्यात येत आहे. काही जिल्ह्य़ांमध्ये सुपारीचा बार, खर्डा मिळतो त्याची किंमत २० रुपये एवढी आहे. असे दिवसाला पाच बार भरणारे लोक आहेत. ही मंडळी सर्वत्र थुंकतात त्यांच्यावर कारवाई कोणी करत नाही. मुखपट्टी नाही म्हणून कारवायाचा सपाटा सुरू असताना थुंकणारी मंडळी सुटून जातात. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. एरवी अनेक दुकानांना टाळेबंदी करणारी यंत्रणा गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

कारवाई

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांतील जप्ती प्रकरणे २३९

पकडलेल्या गुटख्याची किंमत पाच कोटी ३४ लाख ८५ हजार ३३९

औरंगाबाद जिल्ह्य़ात ५५ जप्ती कारवाया.

एक कोटी ८९ लाख ५४ हजार ३७६ रुपयांचा गुटखा पकडला.

दुकानाच्या शेजारीच मद्यपान

* भर रस्त्यात जसे गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच दारू दुकानाच्या शेजारीच मद्यपान करण्यास बसणारेही वाढले आहेत.

* बार बंद असल्याने बसण्याची ठिकाणे म्हणून रानोमाळी दुचाक्यांवरून जाणारेही आहेत.

* शहरात दुकनांच्या बाजूला मद्यपान करणाऱ्यांची संख्या औरंगाबाद शहरात वाढते आहे.

शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे थांबविले पाहिजे. महापालिकेने काही प्रमाणात कारवाई केली आहे. जून आणि जुलै महिन्यात १५१० जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ५१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच मुखपट्टी न बांधणाऱ्यांकडून मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत १३ लाख तीन हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. शहरात थुंकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाईल.

– नंदकुमार भोंबे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख