सुहास सरदेशमुख

बनावट बियाणे, खतांचा तुटवडा अशा नेहमीच्या समस्यांना थेट उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर करोना काळात जोमात असणारी पिके सततच्या पावसामुळे आता हातची गेली आहेत. गोदावरी तुडुंब काठोकाठ भरली आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरण बांधल्यापासून नदीपात्रात पाणी सोडण्याची ही केवळ दहावी वेळ असेल. मराठवाडय़ाच्या नशिबी नेहमी येणारा दुष्काळ या वर्षी नाही म्हणून सुख मानावे अशी स्थिती उत्तरा नक्षत्रापूर्वीपर्यंत होती. मात्र, ऑगस्टच्या शेवटपासून सप्टेंबरमध्ये पावसाने असे काही झोडपून काढले की हातातोंडाशी आलेले सोयाबीनही हातचे गेले. तत्पूर्वी मूग आणि उडीद ही पिकेही हाती लागली नाहीत. सोयाबीन काढणीच्या काळात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठवाडय़ातून वाहणारी मोठी नदी म्हणजे गोदावरी. या नदीपात्रात १२ उच्च पातळी बंधारे. पुढे प्रवाह आंध्रप्रदेशातील पोच्चमपाड धरणापर्यंत जाणारा.

या वर्षी पहिल्यांदा आंध्र प्रदेश सरकार बरोबर समन्वय करून नदीपात्रात जल फुगवटा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. जायकवाडी धरणातून एक लाखाहून अधिक वेगाने पाणी सोडले की पठण शहराला पुराचा धोका संभवतो.  सुदैवाने पाण्याचा विसर्ग ९६ हजार प्रतिसेकंदापर्यंत वाढला.  पण माजलगाव, सिद्धेश्वर या धरणातूनही गोदावरीत पाणी सोडण्यात आल्याने नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी धरणातून एक लाखाहून अधिक प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडावे लागले. इथे गोदावरी पात्राची रुंदी ८०० मीटपर्यंत विस्तारते. तरीही नदीकाठच्या अनेक शेतात पाणी घुसले. नांदेड जिल्ह्यातील पिकांचे नुकसान ८२ हजार हेक्टराचे आहे. साधारणत: ही नुकसानभरपाई द्यावयाची असल्यास सरकारला नांदेडसाठी ५७ कोटी रुपये लागू शकतील. प्रत्येक जिल्ह्याची अशी आकडेवारी काढली तर एक हजार कोटी रुपयांपर्यंतच्या मदतीची गरज असू शकेल. हिंगोली जिल्ह्यात नदीच्या काठच्या गावांमधील जमीन खरवडून गेली आहे. तर आता उभ्या पिकात पाणी घुसल्याने सोयाबीनच्या शेंगांना काढणीपूर्वच मोड आले आहेत. औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यात कापूस अधिक होतो.

आता कापसाचे बोंड गळून पडू लागले आहेत. त्यामुळे मिळाले उत्पन्न तर त्यातूनच थोडेफार अशी स्थिती आहे. तूर पिकांवर मर रोग आला. नागतोडे आणि टोळधाडीमुळेही पहिल्या टप्प्यात पिके किती हाती येतील याविषयी  शंका होत्या. अनेक भागात पिके पिवळी पडू लागली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात मका हे पीक काही अंशी हाती येऊ शकेल. नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी मराठवाडय़ा नित्याची झाली आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षाचे खासदार केंद्र सरकारने आपत्ती म्हणून नुकसानभरपाईसाठी पाहणी पथक पाठवावे अशी मागणी करत आहेत. दुष्काळी वर्षांनंतर करोना संकटात केलेली पेरणी, खत तुटवडय़ावर मात करत बांधावर ते पोहचावे म्हणून केलेले कृषी विभागाचे प्रयत्न पावसाने धुळीस मिळविले एवढे नुकसान दिसून येत आहे.

या वर्षी अचानक एकाच ठिकाणी अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले. एकेका मंडळात रात्रीतून १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाच्या नोंदी आहेत. नगदी पीक म्हणून उसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ऊसही आडवा झाला. काढणीच्या काळातील पाऊस नुकसान करून जातोच. या वर्षीचे नुकसान अधिक आहे.