गतवर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन लक्षणीय कमी झाले. तूर महागली म्हणून हरभरा डाळीचा पर्याय वापरला गेला. बाजारपेठेतील हरभऱ्याची आवक आता घटली असून त्यामुळे हरभऱ्याच्या भावाने क्विंटलला ८ हजार रुपयांचा पल्ला गाठला आहे. सणासुदीच्या दिवसात हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हरभऱ्याच्या डाळीचा भाव ९३ रुपये किलो आहे. तो शंभरी पार करेल,असा अंदाज व्यक्त होत आहे. लातूर बाजारपेठेत ८ हजार २०१ रुपये या दराने मंगळवारी हरभऱ्याचा भाव काढला गेला. बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्यामुळे हा भाव वाढला. सध्या सरासरी ७ हजार ५०० रुपये क्विंटलने हरभऱ्याचे व्यवहार होत असल्याचे नितीन कलंत्री यांनी सांगितले. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात हरभऱ्याचे मोठे उत्पादन होते. तेथील माल विकला गेला असल्यामुळे व जगभरातच सध्या कोणतीच डाळ उपलब्ध नसल्यामुळे डाळीचे भाव वाढत आहेत. मूग डाळीचा भाव ८० रुपये, मसूर डाळीचा भाव ७४ रुपये किलो आहे. तूर डाळीचा भाव १३० रुपये किलो आहे. नवीन डाळी बाजारपेठेत येण्यास किमान सप्टेंबर उजाडेल. रशिया, टांझानिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या भागातील डाळी सप्टेंबर महिन्यात बाजारपेठेत येतील. श्रावणात सणासुदीचे दिवस असतात व पुरणासाठी हरभरा लागतो. तेव्हा हरभऱ्याचे भाव ५ ते १० रुपयांनी वाढतील.