पालकमंत्र्यांचे दांगट यांना आदेश

हर्सूल तलावातून गाळ काढण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मागविलेल्या निविदा प्रक्रियेच्या आधारे कंत्राटदाराला काम देणे चूक होते. जुन्या आयुक्तांनी केलेली ही प्रक्रिया महापालिकेचे नवे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी तपासून घेण्याची आवश्यकता होती. परिणामी खूप अधिक दराने गाळ काढण्याचे काम दिल्याने या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी करावी, असे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी दिले. जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गाळ काढण्याच्या कामाच्या दराबाबत नाराजी व्यक्त केली.

शहरातील ऐतिहासिक हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी २ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. रक्कम मिळाल्यानंतर पाऊस आल्याने हे काम महापालिकेने हाती घेतले नाही. या वर्षी दुष्काळात ही रक्कम खर्च करता येईल, अशी सूचना विभागीय आयुक्तांनी केल्यानंतर महापालिकेने या कामास सुरुवात केली. तथापि जुन्या मंजूर निविदेच्या आधारे कंत्राटदाराला काम दिले. इतर जिल्हय़ांत सुरू असणाऱ्या गाळ काढण्याच्या कामाचे दर आणि हर्सूलमधील दर यात कमालीचे अंतर आहे.

ही रक्कम अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी दराच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी केली. कमी गाळ उपसून मोठा लाभ कंत्राटदार उचलत असल्याचे लक्षात आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी यात लक्ष घालण्याची सूचना केली. गाळ काढण्याचे २२ ते २५ रुपये घनमीटरने इतरत्र सुरू असताना महापालिकेकडून ३२५ रुपयांपेक्षा अधिक दराने एक घनमीटर गाळ काढला जात आहे. त्यामुळे योजनेची बदनामी होते. तसेच जिल्हय़ाची प्रतिमाही वाईट बनते, असे ते म्हणाले. यावर काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनी या प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच भाजपचे अतुल सावे यांनी कंत्राटदार गाळ घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचेही सांगितले. या प्रकरणात महापालिका आयुक्तांनी जुनी निविदा प्रक्रिया व्यवस्थित पाहण्याची गरज होती. त्यांनीही आपले काम व्यवस्थित केले नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत पालकमंत्री कदम यांनी विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे निर्देश देण्यात आले.

या अनुषंगाने डॉ. दांगट यांनीही गाळ काढण्याचे हे दर अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर सध्याच्या दरानेच काम करावे, अशी सूचना केली असल्याचे सांगण्यात आले.

बठकीस आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील, संदीपान भुमरे, हर्षवर्धन जाधव, नारायण कुचे, महापौर त्र्यंबक तुपे, जि. प.चे अध्यक्ष श्रीराम महाजन यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर गाळ काढण्याच्या कामाची पालकमंत्री कदम यांनी पाहणी केली.

जलयुक्तच्या संथगतीवर बागडे यांची नाराजी

जलयुक्तची कामे संथगतीने सुरू असल्याबाबत नाराजी व्यक्त करीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हे काम काय पिढय़ान् पिढय़ा करायचे आहे काय, असा सवाल केला. अंबड तालुक्यातील डोणगाव येथे मोठे काम विनानिविदा लोकसहभागातून उभे केले जाते. मात्र, एकेका गावात १४ लाख रुपये खर्च करूनही काम दिसत नाही.

घामाघूम नेते बंद ध्वनिक्षेपक

वार्षिक आराखडय़ाची बैठक सुरू झाली आणि थोडय़ाच वेळात नेते घामाघूम झाले. कारण जिल्हाधिकारी कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा नीट काम करीत नव्हती. नेते घामाघूम झाले, तरीही चर्चा सुरू होती. मग बहुतांश ध्वनिक्षेपक बंद असल्याचे लक्षात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोरील ध्वनिक्षेपकात खरखर सुरू झाली. शेवटी न राहून ते म्हणाले, ही यंत्रणा सरकारी मालकीची आहे की किरायाने लावली आहे! या विषयावर आमदारांचा स्वरही आक्रमक होऊ लागल्याचे दिसताच आता नवीन बैठक व्यवस्था विभागीय आयुक्तालयात उभी केली जात असल्याचा संदर्भ देत विषय पुढे वाढू दिला गेला नाही. मात्र, नेते घामाघूम झाल्याचे दिसताच एक पंखा अगदी अध्यक्षांसमोर आणण्यात आला. त्यावर ‘असे करू नका, इथे पेपरवाले बसले आहेत,’ असे सांगत तो पंखा काढून घेण्यास हरिभाऊंनी बजावले. पण घामाघूम नेते आणि बंद ध्वनिक्षेपकामुळे नेते हैराण झाले.