राज्य सरकारने ‘हॉट डे’ घोषित केलेल्या काळात १६ ते २१ मे दरम्यान जिल्ह्य़ात सात जणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्य़ात सर्वत्र उष्णतेची लाट कायम आहे. त्यामुळे सरकारने हा कालावधी हॉट डे म्हणून जाहीर करून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. जनतेनेही स्वत:हून खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. याच काळात जिल्ह्य़ात विविध ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला. इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतवारा भागातील भारत मेडिकलसमोर ६० वर्षीय वृद्धाचा, याच भागातील यन्नावार यांच्या दुकानासमोर ४५ वर्षीय महिलेचा, जुना मोंढा भागातील नवीन पुलाखालील शनिमंदिराजवळ ५५ वर्षीय व्यक्तीचा, माहूर बसस्थानकासमोर मध्यमवयीन व्यक्तीचा, अर्धापूरमध्ये ५५ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. शनिवारी नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकावर बसस्थानक प्रमुखांच्या कक्षासमोर वृद्ध महिला मृतावस्थेत आढळली. पत्रकारांनी याची माहिती बसस्थानकावरील पोलिसांना कळविली. त्यानुसार वजिराबाद पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली. या महिलेचीही ओळख पटू शकली नव्हती.
या सात जणांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसले, तरी ऐन उष्माघाताच्या काळात या घटना घडल्या असल्याने ते एक कारण असू शकते, असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला. दरम्यान, शहराच्या आनंदनगर भागात अजित हंसाजी मंगनाळे (वय ४४) यांचाही शनिवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास रस्त्यातच ते चक्कर येऊन पडले आणि मरण पावले.