औरंगाबाद : औरंगाबाद शहरात मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला रविवारी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी ७ पासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत बरसत होता. औरंगाबाद शहर व परिसरात रोहिणी नक्षत्रातील १५ दिवसांपैकी आठ ते दहा दिवस पाऊस किंवा पावसाळी वातावरण राहिले. २९ मे पासून जवळपास दररोजच पावसाने हजेरी लावली. २९ मे रोजी ६.१ मिमी, ३० मे ला पावसाळी वातावरण.

३१ मे रोजी १२.७ मिमी पाऊस झाला. १ जून रोजी ५.१, २ जून रोजी तब्बल ४३.९ मिमी पाऊस झाला. ३ जून रोजी पुन्हा पावसाळी वातावरण राहिले तर ४ जून रोजी १२.७ मिमी पाऊस झाला, अशी माहिती महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अंतराळ व विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. ५ जून रोजी वैजापूर तालुक्यातही अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

रोहिणी नक्षत्रातील अनेक पावसांनंतर सोमवार, दि. ७ जूनपासून लागणाऱ्या मृग नक्षत्रातही पाऊस बरसेल आणि पेरणीची कामे हातावेगळी करता येतील, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.