घरांची पडझड; छावणीतील जनावरांचे हाल; एकाचा मृत्यू
मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या हजेरीत ठिकठिकाणी घरांची पडझड झाली. रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली तर छावण्यांमध्ये असलेल्या जनावरांचेही प्रचंड हाल झाले. या पावसात सर्वाचीच दाणादाण उडाली. विजेचा खांब अंगावर पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना धनेगाव (ता. केज) येथे घडली. दरम्यान शहरांच्या ठिकाणी स्थानिक नगरपालिकांकडून मान्सूनपूर्व व्यवस्थापनाचे करण्यात आलेले दावे फोल ठरले असून पहिल्याच पावसामध्ये त्यांच्या कारभाराचे पितळ उघडे पडले. नाल्या तुडूंब भरल्याने पाणी रस्त्यावर आले होते.
बीड जिल्ह्यत शनिवार, दि. ४ जून रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वादळासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरात झालेल्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले होते. नवी भाजी मंडईतील नाल्या तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले होते. केज तालुक्यात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड झाली आहे. धनेगाव येथे शेषेराव किसन गुजर (वय ५५) यांच्या अंगावर विजेचा खांब कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. परळी शहर आणि परिसरात पावसाने लावलेल्या हजेरीने घरांची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली. बरकतनगर, भीमनगर, मिलिंदनगर या भागामधील घरावरील पत्रे उडाल्याने दाणादाण झाली. यामुळे चार ते पाच वाहनांचे नुकसानही झाले आहे. विजेचे बारा खांब कोसळल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. आष्टी तालुक्यात पावसामुळे छावण्यांमधील जनावरांचे प्रचंड हाल झाले. कडापासून जवळच असलेल्या चिंचाळा येथील छावणीतील चार जनावरांचा मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. धारुर तालुक्यातील आंबेवडगाव, गावंदरा, चोरंबा, अरणवाडी, जहांगीरमोहा, भायजळी, गोपाळपूर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे घरावरील पत्रे उडून विजेचे खांबही कोसळले. वादळामुळे खांब कोसळण्याच्या घटना वाढू लागल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. नगरपालिकांनी मान्सूनपूर्व स्वच्छतेची तयारी पूर्ण झाल्याचे केलेले दावे पहिल्याच पावसात फोल ठरले. ठिकठिकाणी नाल्यातील गाळ न काढल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. सर्वत्र दरुगधी पसरल्याने नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला.